coronavirus: ...अन् देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणलं!

By अतुल कुलकर्णी | Published: May 28, 2020 07:57 AM2020-05-28T07:57:52+5:302020-05-28T08:03:41+5:30

देवेंद्र फडणवीस यांची टीका आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर सत्ताधारी पक्षात एकवाक्यता नाही असे चित्र तयार झाले. त्यामुळे तीन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत बुधवारी ‘हम साथ साथ है’ हे दाखवून दिले.

coronavirus: Devendra Fadnavis brings together leaders of Mahavikas Aghadi! | coronavirus: ...अन् देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणलं!

coronavirus: ...अन् देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणलं!

Next
ठळक मुद्दे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कोरोनाच्या काळात पहिल्यांदा एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन आम्ही एकत्र आहोत, असे दाखवून दिले कोरोनाच्या काळात सत्ताधारी पक्षाचे मंत्री रोज एकमेकांशी बोलत होते, व्हिडीओ कॉन्फरसींगच्या सहाय्याने बैठका घेत होते. माध्यमांना फक्त एकटे मुख्यमंत्री बोलत होते. पण मंत्र्यांमध्ये कुठेतरी कटूता येत होती. याआधी देखील फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र शपथ घेतली व सरकार स्थापन केले त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार चिडून एकत्र आल्याचे राज्याने पाहिले होते

- अतुल कुलकर्णी 
मुंबई - विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने राज्याला किती रुपयांची मदत केली याची आकडेवारी सांगत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आणि विखुरलेले महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कोरोनाच्या काळात पहिल्यांदा एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन आम्ही एकत्र आहोत, असे दाखवून दिले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्या मतदारसंघात इस्लामपूरला होते. मात्र त्यांना पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुंबईत बोलावून घेतले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महूसल मंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री अनिल परब मुंबईत होते. शरद पवार राज्यपालांना भेटून आल्यानंतरच तीन्ही पक्षांनी एकत्रपणे जनतेसमोर गेले पाहिजे अशी चर्चा झालीच होती. शिवाय प्रशासनाने देखील माध्यमांना माहिती दिली पाहिजे असे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसारच मुख्य सचिव अजोय मेहता व अन्य अधिकाऱ्यांनी एकत्रपणे मंगळवारी पत्रकारपरिषद घेण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एकत्रित समन्वय समितीची बैठक घ्यायची असेही ठरले होते. त्यावेळी फडणवीस यांची पत्रकार परिषद जाहीर झालेली नव्हती. मात्र ती झाली आणि पडद्याआड राजकीय हालचालींना वेग आला. बुधवारी समन्वय समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे ठरले. त्यानुसार ती झाली.

दरम्यान, अनिल परब यांनी एकट्याने त्यांची पत्रकार परिषद घेण्याचे आधीच जाहीर केले होते. पण त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही गेले पाहिजे व मंगळवारी राज्यभर जे चित्र निर्माण केले गेले त्याला छेद दिला पाहिजे असे ठरवण्यात आले. या संयुक्त पत्रकारपरिषदेत काय सांगायचे याचीही चर्चा सकाळी झालेल्या बैठकीत झाली. त्यानुसार अधिकाऱ्यांना सगळी माहिती गोळा करण्यासाठी सांगण्यात आले आणि तीन्ही नेत्यांनी एकत्रीतपणे पत्रकार परिषद घेतली. कोरोनाच्या काळात सत्ताधारी पक्षाचे मंत्री रोज एकमेकांशी बोलत होते, व्हिडीओ कॉन्फरसींगच्या सहाय्याने बैठका घेत होते. माध्यमांना फक्त एकटे मुख्यमंत्री बोलत होते. पण मंत्र्यांमध्ये कुठेतरी कटूता येत होती. निर्णय प्रक्रीयेत आपल्याला सहभागी केले जात नाही असा सूर उमटत होता. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी तक्रारी होत्या. त्यावरही शरद पवार, उध्दव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांच्या बैठकीत निर्णय झाले होते.

पण मंगळवारी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली, तिकडे दिल्लीत काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर सत्ताधारी पक्षात एकवाक्यता नाही असे चित्र तयार झाले. त्यामुळे तीन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत बुधवारी ‘हम साथ साथ है’ हे दाखवून दिले. याआधी देखील फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र शपथ घेतली व सरकार स्थापन केले त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार चिडून एकत्र आल्याचे राज्याने पाहिले होते. त्याचीच छोटी पुनरावृत्ती बुधवारी घडली. यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये मधल्या दोन महिन्यात काय झाले हे विसरुन सगळे एकत्र आले. भाजपला आम्ही जेवढा काळ सत्तेपासून दूर ठेवू तेवढी त्यांच्यातील अस्वस्थता वाढेल आणि त्यातून कोरोना नंतर जे काही घडले ते सगळा महाराष्ट्र पाहिल, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने दिली ती पुरेशी बोलकी आहे.

 

Web Title: coronavirus: Devendra Fadnavis brings together leaders of Mahavikas Aghadi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.