CoronaVirus : राज्यातील जनतेच्या मदतीसाठी काँग्रेसची राज्यस्तरीय २४x७ हेल्पलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 05:07 PM2020-04-01T17:07:35+5:302020-04-01T17:08:17+5:30

कोरोना हे मानव जातीवरील मोठे भयंकर संकट आहे. याचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

CoronaVirus :Congress 24X7 helpline to people of the state by balasaheb thorat vrd | CoronaVirus : राज्यातील जनतेच्या मदतीसाठी काँग्रेसची राज्यस्तरीय २४x७ हेल्पलाइन

CoronaVirus : राज्यातील जनतेच्या मदतीसाठी काँग्रेसची राज्यस्तरीय २४x७ हेल्पलाइन

googlenewsNext

मुंबई- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राज्यभर वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी व लोकांच्या मदतीसाठी यशोधन या संगमनेर येथील कार्यालयात स्वतंत्र २४x७ आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने कायम देशहित व नागरिकांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोरोना या विषाणूने जगभरासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे. कोरोना हे मानव जातीवरील मोठे भयंकर संकट आहे. याचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

कोरोना रोखण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून संगमनेर येथील यशोधन संपर्क कार्यालयात राज्यस्तरीय आपत्कालीन मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये २४ तास मदत केली जाणार आहे. गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्थेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू न मिळणे, जादा दराने विक्री व उपलब्धता, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक समस्या या बाबतच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत.

अशा कामांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये व तातडीने मदत या गरजू नागरिकांना मिळावी याकरता नामदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून ही आपत्कालीन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यशोधन कार्यालय हे संगमनेर तालुका व जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठे मदतीचे केंद्र ठरले असून नागरिकांना मागील सात वर्षात २४ तास मदत मिळत आहे.

कोरोनाच्या या काळामध्ये नागरिकांचे प्रश्‍न नोंदवून घेतले जाणार असून त्या प्रश्नांची योग्य विभागामार्फत सोडवणूक केली जाणार आहे. हे काम २४ तास सुरू असून याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ०२४२५-२२७३०३,२२७३०४ व ९६८९३०४३०४, ९६८९११३९८३ या क्रमांकावर तसेच व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून ९५२७०३७०३७ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. सोशल डिस्टन्शिंग हाच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा एकमेव प्रभावी उपाय आहे त्यामुळे घरातच राहा सुरक्षित राहा. तुम्हाला काही मदत हवी असल्यास आमच्या हेल्पलाईन वर एक फोन करा काँग्रेस कार्यकर्ते आपल्या मदतीला तत्पर आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या आवाहनानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने गरजू व अडचणीत असलेल्यांच्या मदतीला धावून जात आहेत. ज्यांना गरज आहे त्यांना जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जात आहेत.  या संकटात युवक काँग्रेसचे कार्यकर्तेही मदत कार्यात सहभागी झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून आवश्यक ती सर्व मदत पोहवण्याचे काम सुरु आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने युवक काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेऊन १० हजार पिशव्या रक्त जमा केल्या जाणार आहेत. 
 

Web Title: CoronaVirus :Congress 24X7 helpline to people of the state by balasaheb thorat vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.