CoronaVirus Among the dead are the senior citizens, tand men more hrb | CoronaVirus मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, पुरुषांचे प्रमाण अधिक

CoronaVirus मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, पुरुषांचे प्रमाण अधिक


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सोमवारी कोरोनाच्या १२० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णसंख्या ८६८ झाली. ७० कोरोनाबाधित बरे झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात ७ बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी झाली. यात नालासोपारा येथील नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा समावेश आहे. मृतांमध्ये ज्येष्ठांचे त्यातही पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.


मृतांच्या संख्येतील ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार येथील आहेत. राज्यातील रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ५२ झाली आहे. आजपर्यंत पाठविलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. सध्या ३२ हजार ५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.


निजामुद्दीन येथील संमेलनात राज्यातील ज्यांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध सुरू आहे. आतापर्यंत या व्यक्तींपैकी ८ जण कोरोनाबाधित आढळले. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगरमधील आहेत; तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीममधील आहे.
एकूण मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण ७३ टक्के आहे. ४५ वर्षांखालील एकाचा मृत्यू झाला आहे. साधारणपणे ६० टक्के मृत्यू हे ६१ वर्षांवरील व्यक्तींचे आहेत. रविवारपर्यंत झालेल्या एकूण ४५ मृत्यूंपैकी साधारणपणे ७८ टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजारही होते.


देशात मृतांमध्ये वयोवृद्ध जास्त
नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४७५६ जण बाधित आहेत. तर मृत्यू झालेल्या १३२ जणांमध्ये ६० पेक्षा जास्त वय असलेले सर्वाधिक रुग्ण होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, वृद्धांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. मृत्यू झालेल्या ६३ टक्के रुग्णांचे वय ६० पेक्षा जास्त होते. त्यातही मृत्यू झालेले ८६ टक्के रुग्ण कोणत्या ना कोणत्या आजाराने आधीच ग्रासले होते.


हायड्रॉक्सिक्लोरोफिनबाबत सध्या तरी पुरेसे निष्कर्ष नाहीत
हायड्रॉक्सिक्लोरोफिनच्या उपयुक्ततेबाबत आयसीएमआरचे ज्येष़्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले,
हे औषध सध्या केवळ रुग्णांवर उपचार करणारे, आरोग्यसेवक, बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना दिले जाते. औषध म्हणून याचा अभ्यास केवळ ३० जणांवरच केला आहे. त्याबाबत सध्या पुरेसे निष्कर्ष उपलब्ध नाहीत.


जगातील रुग्णसंख्या
१३ लाखांकडे

जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सोमवारी १३ लाख १२ हजारांवर गेली असून आतापर्यंत ७२,६०७ जण मरण पावले आहेत. अमेरिकेतील रुग्णांचा आकडा
३ लाख ४० हजारांहून अधिक असून मृतांची संख्या ९,७०० झाली आहे. त्याखालोखाल इटली (१६ हजार), स्पेन (१३ हजार), फ्रान्स (८ हजार १००) आणि ब्रिटन (५ हजार) असा मृतांचा आकडा आहे.

Web Title: CoronaVirus Among the dead are the senior citizens, tand men more hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.