CoronaVirus admit me in government hospital if infected with corona devendra fadnavis to girish mahajan | CoronaVirus News: मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयातच दाखल करा; फडणवीसांचा 'या' नेत्याला फोन

CoronaVirus News: मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयातच दाखल करा; फडणवीसांचा 'या' नेत्याला फोन

मुंबई: राज्यावरील कोरोना संकट अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. अनेक राजकीय नेत्यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. यातील अनेक नेते कोरोनावर मात करून परतले आहेत. या संकट काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यभर दौरे करत असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कोरोनाचा धोका असूनही फडणवीस यांचे दौरे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या फोनची सध्या सर्वत्र सुरू आहे. 

'गिरीश, मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात दाखल करा. मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका,' असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं. फडणवीस यांचे शब्द ऐकताच महाजन यांच्या अंगावर शहारे आले आणि काय बोलावं हेच त्यांना सुचेनासं झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

राज्यातील कोरोना परिस्थिती, रुग्णांलयामध्ये मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून राज्यभर फिरत आहेत. या माध्यमातून ते पालिका आणि आरोग्य प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. कोविड रुग्णालयांना भेटी देऊन ते स्वत: परिस्थितीची पाहणी करत आहेत. फडणवीस यांच्या दौऱ्यांची संख्या पाहता त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती वाटत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी गिरीश महाजन यांना फोन करून ही सूचना दिली.

फडणवीस यांच्या या संभाषणाचा मेसेज ट्विटरवर तुफान व्हायरल झाला आहे. त्यातील दोन ट्विट खुद्द महाजन यांनी रिट्विट केली आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी फोन केल्याच्या वृत्ताला महाजन यांनी दुजोरा दिल्याचं स्पष्ट होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी फडणवीस हे कोरोना होईल या मानसिकतेत फिरत असल्याचं म्हणत आई, भवानीनं फडणवीस यांना उदंड आयुष्य द्यावं, अशी प्रार्थनाही केली आहे. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनीही ट्विट करत आई जगदंबे, माझ्या नेत्याला सदैव निरोगी ठेव व त्यांच्या हातून गोरगरीबांची, महाराष्ट्राची सेवा घडत राहो, असं म्हटलं आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus admit me in government hospital if infected with corona devendra fadnavis to girish mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.