coronavirus: The action will be on those who do not support medical examination - balasaheb thorat BKP | coronavirus : वैद्यकीय तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार

coronavirus : वैद्यकीय तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार

ठळक मुद्देवैद्यकीय तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारकोरोनाचे गंभीर संकट ओळखा आणि घरातच सण, उत्सव साजरे करा यात्रा, धार्मिक कार्यक्रम, जयंती-पुण्यतिथीच्या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याच्या प्रशासनाला सूचना

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वैद्यकीय तपासणीसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वैद्यकीय तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. तसेच लॉकडाऊनमुळे प्रदेश काँग्रेसकडून आंबेडकर जयंतीचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

थोरात म्हणाले की, ‘आपण बाहेरील देशातून, बाहेरील राज्यातून आलेला असाल तर तपासणीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे या.  निजामुद्दीनहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात कोणी आलेले असेल तर त्यांनी स्वत:हून प्रशासनाला कळवावे, आपल्यासाठी व आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी हे महत्वाचे आहे. अन्यथा प्रशासन सक्तीने कारवाई करेल, तसे अधिकार त्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर सामाजिक तेढ निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नये. खोटे व्हिडीओ, बातम्या पाठवून वातावरण बिघडवू नये, प्रशासन कामाच्या तणावाखाली आहे, त्यांना सहकार्य करावे.

  'कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथीच्या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. या सोबतच प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे सार्वजनिक कार्यक्रम दरवर्षी होत असतात, ते रद्द करत असल्याची घोषणा करून त्या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वाचन करून त्यांना अभिवादन करुया,' असे आवाहनही बाळासाहेब थोरात यांनी केले.

थोरात पुढे म्हणाले की, कोरोना विरोधातील लढाई निर्णायक वळणावर आली आहे, आतापर्यंत जी एकजूट आणि जिद्द दाखविली तिचे कौतुक आहे. आता कसोटीचा काळ सुरु झाला आहे. गुढी पाडवा, राम नवमी, पंढरपूरची वारी आपण सर्वांनी घरात राहूनच साजरी केली असेच सामाजिक भान यापुढेही ठेऊन कोणत्याही जातीचा, धर्माचा असा विचार करुन सण उत्सव साजरे करण्यासाठी गर्दी करण्याची आवश्यकता नाही. येणारी महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे न करण्याचे आवाहन मी राज्यातील जनतेला करतो आहे.

Web Title: coronavirus: The action will be on those who do not support medical examination - balasaheb thorat BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.