Corona Virus news Well done Uddhavji, | शाब्बास उद्धवजी…

शाब्बास उद्धवजी…

-राजा माने

मुंबई: उद्या देश दिवे लावायला निघालेला असतानाच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्राशी संवाद साधला आणि अपसुकपणे माझ्या तोंडातून उदगार निघाले...शाब्बास उद्धवजी!...

खरं तर आजच्या "कोरोनामय कौटुंबिक" वातावरणात कौतुक, कृतज्ञता, शाबासकी या शब्दांचे सच्चे हकदार हे डॉक्टर्स, सिस्टर्स, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि चमकोगिरीपासून कोसो दूर राहून स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष लढणारे कार्यकर्ते हेच आहेत. त्यांना सॅल्यूट करूनच अनेकांना आजच्या बाक्या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकावी, अशी भावना तुमच्या-माझ्या मनात का निर्माण व्हावी? मन याच प्रश्नाचे उत्तर शोधू लागले.

पुरोगामी लढा देणारे प्रबोधनकार ठाकरे, हे घराच्या उंबरठ्याजवळ जमणाऱ्या पादत्रानांच्या गर्दीची महती आपले पुत्र बाळासाहेब यांना सांगायचे. "गर्दीची भाषा" बोलण्याचा कानमंत्र देणारे प्रबोधनकार होते. त्यांचा तोच "ठाकरी बाज" जतन करीत हिंदुत्व आणि मराठी अस्मितेसाठी आयुष्यभर ठोकशाहीची केवळ भाषाच नव्हे तर तसा अमल करणारे बाळासाहेब ठाकरे… त्यांची ठाकरेशैली आणि आक्रमक वारसा, सदैव चर्चिला जातो. त्याच वारस परंपरेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे !

एकीकडे टाळ्या-थाळ्या वाजविण्याच्या आणि दिवे लावण्याच्या मोहिमा तर दुसरे ठाकरे गोळ्या घालण्याची भाषा बोलत असताना उद्धव यांनी मात्र महाराष्ट्राला वेगळ्याच "ठाकरेशैली"चे दर्शन घडविले. आज कोरोना संकटाने प्रत्येक कुटुंबाला अनामिक काळजीने विळखा घातला आहे. अशावेळी मुख्यमंत्री म्हणून अथवा एका सत्ताधारी पक्षाचा प्रमुख म्हणून नव्हे तर एक आपल्यातला माणूस, कुटुंबप्रमुख या नात्यानेच महाराष्ट्राशी समरस झाल्याचा अनुभव तुम्ही-आम्ही घेतला. संकटाच्या वेळी कोणत्याही कुटुंबाच्या प्रमुखाकडून सर्वसमावेशक सावध भूमिका, सर्वांना सोबत घेण्याची हातोटी आणि धैर्याला संयमाची जोड देण्याचे कौशल्य अपेक्षित असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची कुटुंब प्रमुखाकडून हीच अपेक्षा असते ना ! नेमक्या त्याच भूमिकेला न्याय देण्यात कोरोनाच्या आजच्या टप्प्यापर्यंत ते यशस्वी झाले म्हणूनच...शाब्बास उद्धवजी!

कोरोना विरुद्धची अर्धी लढाई जिंकत असल्याबद्दल शाबासकी देत असतानाच पुढील लढाईचे गांभीर्य अधोरेखित करावे लागेल. पुढच्या टप्प्यात आता मुंबई कोरोनामुक्त करायची असेल तर ज्या कुटुंब प्रमुखांच्या भूमिकेत उद्धव यांना महाराष्ट्राने अनुभवले, अगदी त्याच भूमिकेत शाखापातळीवरील प्रत्येक शिवसैनिकाला यावे लागेल. सोशल डिस्टन्स आणि आरोग्य सुरक्षितता तीच भूमिका जतन करू शकते. त्याच भुमिकेत राज्यातील सर्वच पक्षाचा कार्यकर्ता दिसायला हवा.

नरेंद्र मोदी यांचे रात्री नऊ वाजता देशभर नऊ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन चूक की बरोबर, हा वादाचा मुद्दा असू शकेल. पण त्या दिव्यांच्या प्रकाशाने भारतातील प्रत्येक अंगण उजळून निघेल, हे कोण नाकारणार ? पण याच प्रकाशाने सर्व जाती-धर्माला, राजकीय पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांना जबाबदार कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेने प्रकाशमान केले, तर कोरोना नेस्तनाबूत होवून उभा भारत उजळून निघेल.

(लेखक लोकमतचे राजकीय संपादक आहेत)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus news Well done Uddhavji,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.