मुंंबई, पुण्यात लॉकडाउन वाढणार; जिल्हाबंदी मात्र कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 06:24 AM2020-04-08T06:24:25+5:302020-04-08T06:25:08+5:30

कोरोनाबाधित कमी असलेल्या ठिकाणी व्यवहार पूर्वपदावर येणार

Corona Virus Lockdown period to extend in Mumbai, Pune | मुंंबई, पुण्यात लॉकडाउन वाढणार; जिल्हाबंदी मात्र कायम राहणार

मुंंबई, पुण्यात लॉकडाउन वाढणार; जिल्हाबंदी मात्र कायम राहणार

googlenewsNext

अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई, पुण्यासह काही शहरांमधील कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. धारावी झोपडपट्टी, वरळी या दाट लोकवस्ती असलेल्या भागातही रुग्ण सतत आढळत आहेत, त्यामुळे एमएमआरडीएसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, नागपूर या भागातील लॉकडाऊन काही काळ वाढवला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लोकमतला दिली.
या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र रुग्णांची संख्या जोपर्यंत पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत लॉकडाऊन काढणे अडचणीचे होऊ शकते. हा आजार कसा आणि कुठे पसरत आहे हे ज्याच्यापासून लागण झाली आहे, त्याच्या मुळाशी जाईपर्यंत आणि ती व्यक्ती कितीजणांना त्या काळात भेटली हे कळेपर्यंत काही जणांना लागण झालेली असू शकते. त्यामुळे लगेचच काही निर्णय घेणे व लॉकडाऊन काढणे घाईचे ठरेल त्यामुळे असा निर्णय घेत असल्याचे थोरात म्हणाले. राज्यात जवळपास १० ते ११ असे जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुदैवाने एकही रुग्ण आढळलेला नाही. ही आपल्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे १४ तारखेनंतर असे जिल्हे अंतर्गत व्यवहारासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र त्या जिल्ह्यांना जिल्हाबंदी लागू असेल, त्यांना अन्य जिल्ह्यात जाता येणार नाही असेही महसूलमंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ठाकरे अनुकूल
मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीतही बहुतेक सर्व मंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची भूमिका मांडली, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यास अनुकूलता दर्शवली; मात्र केंद्र सरकारशी सल्लामसलत करून लॉक डाऊन वाढवण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल येईल असे त्यांनी बैठकीत सांगितले.

लॉकडाउन वाढविण्याचा
केंद्र सरकारचाही विचार

नवी दिल्ली : देशव्यापी ‘लॉकडाऊन’ची मुदत १४ एप्रिल रोजी मध्यरात्री संपल्यानंतरही तो पूर्णपणे उठवू नये, अशी मागणी अनेक राज्यांनी व तज्ज्ञांनी केल्याने यावर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार सुरु केला असल्याचे, सरकारी सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राखेरीज राजस्थान, उत्तर प्रदेश आसाम, छत्तीसगढ व झारखंड अशा किमान सहा राज्यांनी ‘लॉकडाऊन’ पूर्णपणे उठवू नये, असे सुचविले आहे.
देशव्यापी नव्हे तरी जेथे करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत अशा राज्यांपुरता ‘लॉकडाऊन’ सुरु ठेवणे व आंतरराज्य सीमांची बंदीही सुरुच ठेवणे या पर्यायावरही विचार होऊ शकतो.

अर्थव्यवस्थेपेक्षा आरोग्य महत्त्वाचे : अर्थव्यवस्थेच्या चिंतेपक्षा माणसांचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ कसा व केव्हा उठविताना याचा विचार प्रामुख्याने केला जायला हवा, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

Web Title: Corona Virus Lockdown period to extend in Mumbai, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.