पुणे : कोरोनविषयी सध्या सामान्यांच्या मनात अनेक शंका आणि भीतीही आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे नागरिक मानसिक तणावाखाली वावरत आहेत. सर्दी, खोकला झाला तरी आपल्याला कोरोनाची लागण तर झालेली नाही ना, अशी भीती मनात दाटून येत आहे. ही भीती दूर करण्यासाठी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी आता डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. व्हर्च्युअल पद्धतीने डॉक्टर समुपदेशनासाठी सरसावले आहेत.सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत सामान्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळावे म्हणून 'एटना' या संस्थेच्या व्ही हेल्थच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामाध्यमातून व्हर्च्युअल डॉक्टरांचे समुपदेशन मोफत उपलब्ध आहे. कोवीड १९च्या प्रादुभार्वाच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी ते मार्गदर्शन करत आहेत. देशभरातील लोकांना टेलिफोन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपले नाव गोपनीय राखून त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे.जगभरातील सरकारे आणि हेल्थकेअरमधील नामांकित संस्था विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सामाजिक विलगीकरणाचे आवाहन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये न जाता आपल्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही विषयावर ते डॉक्टरांशी सल्लामसलत करू शकतील. गंभीर परिस्थितीचे व्यवस्थापन कसे करावे, छोट्या आजारांमध्ये कोणते उपचार घ्यावेत, अन्य उपचारांच्या पयार्यांविषयी सल्ला घेणे, आपल्या वैद्यकीय रिपोर्टसचा अर्थ समजून घेणे, निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन घेणे आदी बाबींविषयी नागरिक डॉक्टरांशी संवाद साधू शकणार आहेत.सध्याच्या परिस्थितीमध्ये दवाखान्यात जायचे कसे, या संभ्रमात असणा-यांना हे उपयुक्त ठरेलच; परंतु ज्या वयोवृद्धांना आणि रुग्णांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित बाबी जाणून घेत त्या घरातूनच हाताळता येऊ शकतील. या पुढाकारामुळे प्रत्यक्ष संसगार्चा धोका खूप कमी होणार आहे.व्ही हेल्थ व्हर्च्युअल डॉक्टर कन्सल्टेशन सर्व्हिस ही मोफत असून ती नोंदणी केल्याच्या दिवसापासून ३० दिवसांसाठी मोफत उपलब्ध होणार आहे. जे लोक त्यासाठी नोंदणी करतील ते आपल्या कुटुंबातील अन्य चार लोकांना त्या सेवेचा लाभ देऊ शकतील. ज्या लोकांच्या मनात कोरोनाविषयी कोणत्याही शंका असतील त्यांनी व्हर्च्युअल डॉक्टरांच्या समुपदेशनासाठी १८०० १०३ ७०९३ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी ९०२९० ९६१८६ या क्रमांकावर मिस कॉल द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मेडिकल कन्सल्टेशन सर्व्हिस ही सेवा सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. या विधायक उपक्रमाविषयी सांगताना डॉ. स्नेह खेमका म्हणाले, 'देशातील सर्वोच्च नेते लोकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन करत आहेत. अत्यावश्यक असल्याखेरीज हॉस्पीटलमध्येही जाणे टाळण्याचे सांगत आहेत. अशा परिस्थितीत व्हर्च्युअल समुपदेशन हा विश्वासू असा मार्ग आहे. देशातील ज्या लोकांना वैद्यकीय संदर्भात कोणताही सल्ला हवा असेल, अशावेळी ते संपर्क साधू शकतात. या परिस्थितीत एक पाऊल पुढे येऊन समाजाला मदत करणे गरजेचे आहे.
Corona virus : व्हर्च्युअल डॉक्टरांकडून कोरोनाविषयी मोफत समुपदेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 14:13 IST
सर्दी, खोकला झाला तरी आपल्याला कोरोनाची लागण तर झालेली नाही ना, अशी भीती मनात दाटून येत आहे. देशभरातील लोकांना टेलिफोन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपले नाव गोपनीय राखून त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे.
Corona virus : व्हर्च्युअल डॉक्टरांकडून कोरोनाविषयी मोफत समुपदेशन
ठळक मुद्देदेशभरातील लोकांना टेलिफोन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधता येणार व्हर्च्युअल डॉक्टरांचे समुपदेशन मोफत उपलब्ध