Corona Vaccination: मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली महत्त्वाची मागणी; मोदी प्रतिसाद देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:15 IST2021-04-06T03:06:53+5:302021-04-06T07:15:12+5:30
Corona Vaccination: सर्वाधिक संसर्गित ६ जिल्ह्यांसाठी दीड कोटी डोसची मागणी

Corona Vaccination: मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली महत्त्वाची मागणी; मोदी प्रतिसाद देणार?
मुंबई : कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. लसीकरणाचा वयोगट ठरवण्याचा अधिकार केंद्र शासनाचा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिले आहे.
४५ वर्षांवरील व्यक्तींना लस द्यावी, अशी मागणी मी आधी केली होती आणि आपण ती मान्य केली. आता लसीकरण वयोगट आणखी कमी करा, असेही या पत्रात म्हटले आहे.
मोठ्या संख्येने तरुण वर्ग, विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल. महाराष्ट्राने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ‘ब्रेक दी चेन’ या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील, अशी कार्यपद्धती ठरविली आहे. विक्रमी लसीकरण केले जात आहे, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
‘आधी जीवन, मग उपजीविका’
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या ६ जिल्ह्यांसाठी केवळ तीन आठवड्यांत ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी आहे. याकरिता दीड कोटी डोस मिळावेत. केंद्र सरकारच्या साहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ‘आधी जीवन, मग उपजीविका’ अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल, असा विश्वास व्यक्त केला.