'चड्डी- बनियन गँग' उल्लेखावरून गोंधळ; आदित्य ठाकरे, नीलेश राणेंमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:50 IST2025-07-15T09:49:49+5:302025-07-15T09:50:33+5:30
आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत नाव न घेता त्यांचा अप्रत्यक्षपणे 'चड्डी-बनियन गँग' असा उल्लेख केला.

'चड्डी- बनियन गँग' उल्लेखावरून गोंधळ; आदित्य ठाकरे, नीलेश राणेंमध्ये जुंपली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात सोमवारी विधानसभेत उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्यात 'चड्डी बनियन गँग' या वक्तव्यावरून खडाजंगी झाली.
नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत नाव न घेता त्यांचा अप्रत्यक्षपणे 'चड्डी-बनियन गँग' असा उल्लेख केला. तसेच "या गँगमधील लोक मारहाण करतात. युती धर्मामुळे मुख्यमंत्र्यांना गँग विरोधात कारवाई करता येत नाही, असा चिमटा काढला.
त्यावर निलेश राणे यांनी आक्रमक होत आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. नेमकी चड्डी कोण आणि बनियन कोण, हे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सांगावे. त्यांना नाव घ्यायला भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द वापरू नयेत. हिंमत असेल तर नाव त्यांनी घ्यावे. नाहीतर ते शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावे. बघूया त्यांच्यात किती हिंमत आहे, असे आव्हान राणे यांनी दिले. उद्धव सेनेचे आमदार यावेळी आक्रमक होण्याच्या तयारीत असतानाच भास्कर जाधव यांनी त्यांना शांत बसायची खूण केली.
मंत्री सुरक्षित नाहीत, एसआयटी चौकशी करा
मुंबई : सरकारने जनसुरक्षा विधेयक आणले. परंतु, राज्यात जनतेच्या नव्हे मंत्र्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. मंत्री घरात सुरक्षित नाहीत. त्यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पैशांची बॅग दिसते. हे मंत्री जाहीर कार्यक्रमात पैसे कमी पडले तर आम्ही देऊ, असे सांगतात. त्यामुळे त्यांची एसआयटी चौकशी करा, अशी खोचक टीका उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केली.
आमदार परब यांनी राज्यात चड्डी, बनियन गँग किंवा चड्डी, टॉवेल गँगचे व्हिडीओ फिरत आहेत, अशी टीका शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट व आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता केली. या मंत्र्यांना कपडे द्या, असा टोलाही लगावला.