मविआत वाद! परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेसवर शरद पवार नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 06:41 PM2024-03-27T18:41:04+5:302024-03-27T18:42:01+5:30

Loksabha Election 2024: काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता शरद पवारांच्या पक्षानेही त्यांची यादी जाहीर करण्याची तयारी केली आहे

Controversy in Mahavikas Aghadi Sharad Pawar upset with Uddhav Thackeray group and Congress for announcing loksabha candidates list | मविआत वाद! परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेसवर शरद पवार नाराज

मविआत वाद! परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेसवर शरद पवार नाराज

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. आघाडीतल्या घटक पक्षाकडून होणाऱ्या उमेदवारांच्या घोषणेवर राष्ट्रवादी शरद पवार गटानं नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनीमहाविकास आघाडीतील मित्रपक्ष आघाडी धर्माचं पालन करत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज बैठक पार पडली. त्यात पवारांनी हे विधान केल्याची बातमी आजतक या हिंदी वृत्तवाहिनीनं दिली आहे. 

पक्षाच्या बैठकीत शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे अन्य घटक पक्ष आघाडी धर्माचं पालन करत नाहीत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आघाडी धर्माचे पालन केले नाही. मविआच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे येत संयुक्त पत्रकार परिषद करणे आवश्यक होते. अद्यापही मविआत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. तरीही विविध जागांवर उमेदवार का घोषित केलेत असं त्यांनी प्रश्न निर्माण केला. 

काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता शरद पवारांच्या पक्षानेही त्यांची यादी जाहीर करण्याची तयारी केली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद घेत उमेदवारांची घोषणा होणार होती. परंतु आता आघाडीतले घटक पक्ष वेगवेगळ्या उमेदवार याद्या घोषित करत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच ५ उमेदवारांची यादी जाहीर करतील. पक्षाच्या बैठकीत १० लोकसभा मतदारसंघाच्या नावावर चर्चा झाली. 

काँग्रेस-ठाकरे गटात वाद

मुंबईत जागावाटपाबाबत काँग्रेस २ जागांवर आग्रही होती. त्यात दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई ही जागा काँग्रेसला हवी होती. परंतु दक्षिण मध्य मुंबईतून उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले. आघाडीत चर्चा सुरू असताना अशारितीने उमेदवारी जाहीर करणे योग्य नाही. ठाकरेंनी आघाडी धर्म पाळावा, अजूनही वेळ गेली नाही, निर्णयाचा फेरविचार करावा अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी करत ठाकरेंच्या उमेदवार यादीवर नाराजी व्यक्त केली. 

'या' जागांवर NCP लढण्याची शक्यता

भिवंडी
बारामती
शिरूर
सातारा
अहमदनगर
वर्धा
दिंडोरी
रावेर
माढा
बीड
 

Web Title: Controversy in Mahavikas Aghadi Sharad Pawar upset with Uddhav Thackeray group and Congress for announcing loksabha candidates list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.