वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:53 IST2025-05-02T14:27:46+5:302025-05-02T15:53:32+5:30
Pooja Khedkar news: पूजा खेडकर आज दिल्ली पोलिसांसमोर हजर झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी न्यायालयाकडून तिला मिळत असलेल्या संरक्षणावर तसेच विलंबावर नाराजी व्यक्त केली.

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप
आरोपी जो काही गुन्हा केला आहे ते कोर्टाने निर्णय दिला तोवर कबुल करत नाही. पूजा खेडकर ही काही स्वत:च्या मनाने पोलीस चौकशीला आली असा भाग नाही. युपीएससी सारख्या संस्थेने या मॅडमना सेवेतून बडतर्फ केले, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला ही गोष्टच पुरेशी आहे. जर खेडकर यांच्यावर केलेले आरोप खोटे निघाले किंवा त्यांनी दिलेली सर्टिफिकेट खरे असल्याचे मानले गेले तर देशात हाहाकार उडेल. लोक बिनदिक्कत खोटे डॉक्युमेंट देऊन काहीही करतील, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केली आहे. पूजा खेडकर आज दिल्ली पोलिसांसमोर हजर झाली आहे.
कुंभार यांनी न्यायालयाकडून तिला मिळत असलेल्या संरक्षणावर तसेच विलंबावर नाराजी व्यक्त केली. वडिलांचे खोटे उत्पन्न देणे, जातीचे दाखले देणे, खोटे वैद्यकीय सर्टिफिकेट देणे या सगळ्या गोष्टी तिच्या विरोधात आहेत. तिने कबूल करणे हे शक्य नाहीय. सर्वोच्च न्यायालयातून वारंवार तिच्या अटकेला संरक्षण दिले जात आहे. आतासुद्धा तिला २१ मे पर्यंत संरक्षण आहे. पोलिसांनी कस्टडीत घेऊन चौकशीची मागणी केली आहे, ती योग्य आहे. कारण पूजा खेडकर ही एकटी नाहीय. तिला खोटे दाखले देणारे, मदत करणारे तिला लवकर युपीएससी जागा मिळावी म्हणून ज्यांनी मदत केली, गाड्या वापरल्या, येथील जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केलेत त्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे कुंभार यांनी सांगितले.
युपीएससीला वडिलांच्या नावात स्पेलिंग बदलून फसविले आहे, तिने नावे कशी बदलली हे समोर आले पाहिजे. तो गुन्हा आहे. वैद्यकीय दाखले तीन ठिकाणी घेतले, वेगळी कारणे पुरावे दाखविण्यात आले. जिथून ही सर्टिफिकेट मिळाली तिथूनही पासपोर्ट ओपन होता, तो कोणीतरी वापरला असेल असे सांगितले जात आहे, असेही कुंभार यांनी सांगितले.
आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी २०२२ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज करताना चुकीची माहिती दिल्याचा आरोप खेडकरवर आहे. मात्र, खेडकरने तिच्यावर झालेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. जुलै २०२४ मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. युपीएससीने गुन्हा दाखल करूनही पूजा खेडकर न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळवत आली आहे, यामुळे तिची चौकशी केल्याशिवाय तपास पुढे जाऊ शकलेला नाही. पूजा खेडकरनं देशातील सर्वात प्रतिष्ठेची आयएएस परीक्षा पास केली होती. ऑल इंडिया रँकिंगमध्ये ती ८४१ क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्यानंतर ट्रेनिंग घेत असिस्टेंट कलेक्टर या पदावर ज्वाईन झाली होती. परंतु गाडीवर लाल दिवा लावण्याची इच्छा आणि अतिरिक्त कलेक्टरच्या चेंबरवर कब्जा करण्याचा प्रयत्न यामुळे तिचा सर्वच खेळ उघड झाला होता. पूजा खेडकर त्यावेळी चर्चेत आली जेव्हा तिने तिच्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावला आणि पुण्याचे अतिरिक्त कलेक्टर सुहास दिवासे यांच्या चेंबरवर कब्जा केला. दिवासे यांनी याबाबत तक्रार केली. त्यानंतर त्यांची बदली वाशिमला झाली.