‘वांद्रे-कुर्ला’सारखी दहा संकुले उभारू
By Admin | Updated: October 8, 2014 04:01 IST2014-10-08T04:01:47+5:302014-10-08T04:01:47+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे मुंबईचा आर्थिक विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे मुंबई व परिसरातील तरुणांना रोजगार मिळत नाही

‘वांद्रे-कुर्ला’सारखी दहा संकुले उभारू
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे मुंबईचा आर्थिक विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे मुंबई व परिसरातील तरुणांना रोजगार मिळत नाही. भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात आल्यानंतर मुंबई व सभोवलतालच्या परिसरात वांद्रे-कुर्ला संकुलासारखी १० संकुले उभारू व त्याद्वारे तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विलेपार्ले, धारावी व भिवंडी येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभांचे आयोजन केले होते.
फडणवीस म्हणाले की, गेल्या १५ वर्षांच्या दोन्ही काँग्रेसच्या राजवटीत मुंबईची अवस्था वाईट झाली आहे. येथे तरुणांना चांगला रोजगार मिळत नाही. मुंबईची आर्थिक वाढ थांबली आहे. येथे मोठी लोकसंख्या असल्याने आर्थिक उलाढाल चालू आहे. पण अशा रितीने फार काळ चालू शकत नाही. मुंबई हे सेवाक्षेत्राचे केंद्र होऊ शकते, पण त्यासाठी सरकारने सुविधा निर्माण केल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)