संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:37 IST2025-07-09T05:36:16+5:302025-07-09T05:37:00+5:30
महाराष्ट्र विधानमंडळाकडून झालेला सत्कार हे राज्यातील १२.८७ कोटी जनतेचे आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांनी आपले वडील माजी राज्यपाल स्व. रा. सू. गवई यांच्या विधिमंडळातील आठवणींनाही उजाळा दिला.

संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
मुंबई : व्यक्तींना पदे मिळतात ती सत्ता नसते, संविधानिक पदावर व्यक्ती जातो तेव्हा त्यालाही घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करणे अभिप्रेत असते. आपल्या देशाची राज्यघटना ही या देशात रक्तविरहित क्रांती निर्माण करण्याचे शस्त्र आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले.
सरन्यायाधीश गवई यांचा विधिमंडळातर्फे विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात सत्कार मंगळवारी करण्यात आला. यावेळी ‘भारताची राज्यघटना’ या विषयावर त्यांचे भाषण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तसेच दोन्ही सभागृहातील सर्व पक्षांचे गटनेते, प्रतोद उपस्थित होते.
‘हे राज्यातील १२.८७ कोटी जनतेचे आशीर्वाद’
सरन्यायाधीश गवई म्हणाले, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय व समता हे मूल्य जपण्यात कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका या तीनही स्तंभांना यश आले आहे. संविधानाच्या ७५ व्या वर्षात सरन्यायाधीश होण्याचा योग आला, याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्र विधानमंडळाकडून झालेला सत्कार हे राज्यातील १२.८७ कोटी जनतेचे आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांनी आपले वडील माजी राज्यपाल स्व. रा. सू. गवई यांच्या विधिमंडळातील आठवणींनाही उजाळा दिला.
‘राजकीय लोकशाही अबाधित ठेवली’
बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते की, संविधान केवळ केंद्राभिमुख किंवा संघराज्यवादी नाही. हे संविधान युद्धाच्या व शांततेच्या काळात देशाला एकत्र ठेवणारे आहे, याची आठवण सरन्यायाधीश गवई यांनी यावेळी करून दिली. अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांनी केलेल्या कायद्यांना मान्यता देताना किंवा बाद करताना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लोकशाही अबाधित ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले.
कायद्यातून पाहिले व्यापक जनहित : फडणवीस
सरन्यायाधीश गवई यांचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकदा लोक न्यायाधीश, सरन्यायाधीश झाले की, कोषात जातात, पण गवई कोषात गेले नाहीत, ते सगळ्यांसाठी उपलब्ध राहिले. कायद्यात व्यापक जनहित कसे बसवता येईल, असे निर्णय त्यांनी उच्च न्यायालयात असताना दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम गोऱ्हे यांनी केले, तर राम शिंदे यांनी प्रास्ताविक केले, आभार राहुल नार्वेकर यांनी मानले. यावेळी एकनाथ शिंदे, अजित पवार, अंबादास दानवे यांचीही भाषणे झाली.