‘पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा...’
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पक्षाचे कार्यकर्ते काही तक्रार मांडतात, तेव्हा ते दाद देत नाहीत. ‘तुम्ही काही बोलू नका’, असे सांगून ते गप्प करतात. असा अनुभव पक्षाच्या शिबिरात आल्याची ठाण्यातील काँग्रेसजनांची कैफियत आहे. हा पक्ष कठीण काळातून जात असतानाही जे पक्षासोबत जोडले आहेत त्यांना लढण्याकरिता बळ देणे ही गरज असताना सपकाळ यांच्या वर्तनाने कार्यकर्ते दुखावत असल्याची वेदना पक्षात व्यक्त होत आहे. माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल तक्रारी होत्या. पण ते बरे म्हणावे, अशी परिस्थिती असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. आता सपकाळ यांनी पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असेल तर गैर काय?
प्रवेश नंदनवनात की आनंदवनात?
काँग्रेसचे सचिन पोटे यांनी पक्षादेशावरून कल्याण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांना माध्यमांनी विचारले की पुढे भाजपमध्ये जाणार की सलगी असलेल्या शिंदेसेनेत जाणार? त्यावर पोटे यांनी मी नंदनवनात नसून आनंदवनात आहे, अशी गुगली टाकली. शिंदेसेनेच्या टेंभी नाक्यावरील ‘आनंदाश्रम’ या कार्यालयातून सर्व सूत्रे हलतात. त्यामुळे आनंदवनातील प्रवेशाचा मार्ग आनंदाश्रमातून जातो, अशी चर्चा रंगली. पोटे यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले सौख्य लपलेले नाही. भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्या स्नेहपूर्ण संबंधांचीही अनेकांना भुरळ पडली आहे. त्यामुळे भाजपच्या नंदनवनात बागडायचे की शिंदेसेनेच्या आनंदवनात हुंदडायचे ते बंडोबांनी ठरवायचे आहे.
काँग्रेसने ‘मनसे’ विचार करावाच !
निवडणूक कुठलीही असो, तिच्या ऐन तोंडावर भाजपविरोधात सक्षम पर्याय उभा करण्याची भाषा काँग्रेस करते; पण नेत्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यामुळे त्यांच्या निर्धाराचे बुडबुडे निवडणुकीआधीच विरतात. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असताना, काँग्रेस मात्र स्वबळाची भाषा करतेय. कारण काय? तर म्हणे, मनसेशी आमची विचारधारा जुळत नाही. पण शरद पवार गटाने या संदर्भात मनसेची बाजू उचलून धरताच भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्याची गरज काँग्रेसला पटली. विजय वडेट्टीवार यांनी तसे संकेत दिले. हे सगळे बघता काँग्रेसची अडचण विचारधारा नाही तर विचारधारांचा वेळोवेळी बदल हीच असावी. थोडा ‘मनसे विचार’ केला, तर कदाचित काँग्रेस या गोंधळातून बाहेर पडेलही. पण वडेट्टीवारांचे संकेत वर्षा गायकवाड यांना पटतील काय?
एवढा पैसा तुम्हाला कशाला हवा?
नांदेडमध्ये भाजप खा. अशोक चव्हाण व अजित पवार गटाचे आ. प्रताप चिखलीकर यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धात आता बाहेरचे नेतेही निशाणा साधून लोकांच्या टाळ्या मिळवित आहेत. शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी भोकरमध्ये प्रचारसभेत चव्हाण परिवाराकडे असलेल्या वेगवेगळ्या एजन्सींचा संदर्भ देत अशोकराव भाकरी खातात की नोटा, असा सवाल केला. सर्व जण भाकरीच खातात. कोणाला एक लागते, कोणाला जास्त लागते. मग, चव्हाणांना एवढा पैसा कशाला हवा? आम्ही प्रामाणिक आहोत. आमच्याकडे हरामाचा पैसा नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यावर आता मागे कुणाकडे तरी बॅग भरून नोटा सापडल्या होत्या त्या कशासाठी होत्या? याची चर्चा सुरू झाली तर नवल ते काय?
शरद पवार गटाची रणनीती कोणती?
उरणच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या शोभा कोळी आणि शरद पवार गटाच्या भावना घाणेकर यांच्यातच थेट लढत होत आहे. या शहरात भाजपनंतर उद्धवसेनेचीच ताकत आहे. मात्र, ‘मनीपॉवर’ वापरण्यास उद्धवसेनेच्या नेत्यांनी अधिक स्वारस्य दाखवलेले नाही. यामुळे मजबूत असतानाही त्यांनी या निवडणुकीवर पाणी सोडल्यानेच नगराध्यक्षपदाची उमेदवारी महाविकास आघाडीतून घाणेकर यांना मिळाल्याचे लपून राहिलेले नाही. आता भाजपसारख्या तगड्या पक्षाबरोबरच्या राजकीय युद्धात त्या कशी रणनीती आखतात आणि ‘मनीपॉवर’चा कसा उपयोग करतात यासह सहकारी पक्ष त्यांना कशी मदत करतात यावरच येथील निकाल अवलंबून असेल एवढे मात्र खरे.
ठाण्यात ‘नाही मी तोडत नाथा...’
ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. अशातच शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी ठाणे आणि नवी मुंबईत बैठक घेऊन महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकवायचा व हा विजय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अर्पण करण्याचा दावा केला. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय याची चर्चा सुरू आहे. महायुती तोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय आपण घ्यायचा नाही, असे शिंदेसेनेने ठरवले आहे. महायुती भाजपकडून तुटली हे चित्र मतदारांत जावे हाच म्हस्के यांच्या वक्तव्याचा हेतू आहे. ‘संगीत मानापमान’मधील ‘नाही मी बोलत नाथा’ या गाजलेल्या पदाप्रमाणे ठाण्यातील एक(नाथा)ने ‘नाही मी तोडत...’ अशी भूमिका घेतली व तेच म्हस्के सांगत नाहीत ना?
Web Summary : Congress faces internal strife, leaders' conflicting statements hinder opposition unity. MNS alignment could help, but faces resistance. Factionalism and financial allegations surface amidst upcoming elections, impacting political strategies in various regions.
Web Summary : कांग्रेस आंतरिक कलह से जूझ रही है, नेताओं के विरोधाभासी बयान विपक्षी एकता में बाधा डालते हैं। मनसे से गठबंधन मददगार हो सकता है, पर विरोध है। आगामी चुनावों के बीच गुटबाजी और वित्तीय आरोप राजनीतिक रणनीतियों को प्रभावित कर रहे हैं।