“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:13 IST2026-04-10T13:13:17+5:302026-04-10T13:13:17+5:30
Congress Vijay Wadettiwar News: सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही एक बनवाबनवी आहे. सरकार शेतकऱ्यांना भुलवत आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
Congress Vijay Wadettiwar News: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीला ऊत आला असून, राजकारणात कोणतीही नीतिमत्ता उरलेली नाही. कोणाला तरी आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे ही आता एक फॅशन झाली आहे, अशा शब्दांत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी फोडाफोडीचे राजकारणावर टीका केली. राज्यातील सत्ताधारी गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत असूनही अस्वस्थ आहेत, त्यांचे मंत्रीही अस्वस्थ आहेत. राज्याला कर्जबाजारी करून हे सत्तेचे खेळ सुरू आहेत. जनतेच्या प्रश्नांकडे बघायला वेळ नाही, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.
प्रसार माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही एक बनवाबनवी आहे. सरकार शेतकऱ्यांना भुलवत आहे. जोपर्यंत ७/१२ कोरा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा खऱ्या अर्थाने फायदा होणार नाही. सध्याच्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांचे उर्वरित कर्ज कायम राहणार आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात नवीन कर्ज मिळणे कठीण होईल. पीकविमा योजनेतून केवळ विमा कंपन्यांचे भले होत असून शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केला पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
मुंबई महापालिकेतील निधीवरून सरकारवर पक्षपाताचा आरोप
मुंबई महापालिकेतील नगरसेवक निधीच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असले पाहिजे. विकास निधी देताना मात्र सर्वांना समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याचे सरकार विरोधकांच्या नगरसेवकांना निधी न देता लोकशाहीची घातक पद्धत रुजवत आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात लव्ह जिहादच्या मुद्द्यावर फाशीची मागणी करणारे सत्ताधारी पक्षाचे नेते महिला शोषणाच्या प्रकरणांवर गप्प का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. चांगल्या घरातील महिलांचे शोषण होत असताना सरकारमधील लोकांचे तोंड शिवले आहे का? असा टोला लगावत त्यांनी हे सर्व मतांच्या राजकारणाचे धंदे असल्याची टीका केली.