Congress Vijay Wadettiwar Reaction over Valmik Karad Surrender: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मीक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण आला आहे. यामुळे पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. CID ची पथके मागील पंधरा दिवसापासून वाल्मीक कराड याचा शोध घेत आहेत. परंतू तो त्यांना सापडू शकला नव्हता. वाल्मीक कराडच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली होती. कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होते, यानंतर त्याचा फोन बंद असल्याचे समोर आले. वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे वाल्मीक कराड याने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करताना शंका उपस्थित केली आहे. तसेच एक महत्त्वाची मागणी केली आहे.
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केले?
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केले? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे. तसेच खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलिस-सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही! इतके दिवस वाल्मीक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे. महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का? या वाल्मीक कराडची हिंमत तर इतकी की सरेंडर होण्याआधी हा व्हिडिओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे. या प्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवले आहे ते पाहता पोलीस, सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही!, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. इतके दिवस झाले पोलीस यंत्रणा काम करते आहे. पण त्यांना इतका वेळ का लागत आहे, ते गुन्हेगार असतील तर ते स्वतः सरेंडर होत आहेत. तर मग इतके दिवस पोलीस यंत्रणा काय करत आहे. त्यांना पकडण्यासाठी इतका वेळ लागत असेल तर, आम्ही न्यायाच्या पेक्षा कधी करायची. आम्हाला न्याय कधी मिळणार, माझी एकच मागणी आहे. ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या केली. जे तीन आरोपी फरार आहेत, लवकरात लवकर अटक करावी. माझ्या वडिलांना आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या एवढीच अपेक्षा आहे, असे मृत संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.