काँग्रेस उद्धवसेनेसह बहुजन विकास आघाडीला खिंडार; राज्यभरातून नेते, पदाधिकारी भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:12 IST2025-08-05T16:10:51+5:302025-08-05T16:12:00+5:30

BJP News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला १०० टक्के यश मिळवून देऊ, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

congress uddhav thackeray group along with bahujan vikas aghadi face setback many leaders and office bearers from across the state join bjp | काँग्रेस उद्धवसेनेसह बहुजन विकास आघाडीला खिंडार; राज्यभरातून नेते, पदाधिकारी भाजपात

काँग्रेस उद्धवसेनेसह बहुजन विकास आघाडीला खिंडार; राज्यभरातून नेते, पदाधिकारी भाजपात

BJP News:धाराशिव जिल्ह्यातील उमरगा,लोहारा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार व प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस समितीचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी शेकडो समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. वसई - विरार येथील ठाकरे गट तसेच बहुजन विकास आघाडीच्या  माजी जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक आणि पदाधिका-यांनीही तसेच रायगड, अमरावती जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या या  कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते आ. प्रकाश भारसाकळे, आ. स्नेहा पंडीत - दुबे, प्रदेश  सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माजी मंत्री व लातुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. 

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे १० माजी सदस्य, ११ माजी सभापती, सहा माजी नगराध्यक्ष, एक बाजार समिती सभापती, बाजार समितीचे १३ संचालक, पाच माजी उपनगराध्यक्ष, पाच माजी उपसभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोन संचालकांनी तसेच १५ नगरसेवकांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला. अमरावतीतील अंजनगाव सुर्जीचे माजी नगराध्यक्ष देविदास नेमाडे यांचाही सहका-यांसह भाजपा प्रवेश झाला. दक्षिण रायगडच्या बापूसाहेब सोनगीरेंसह अनेकांनीही पक्षप्रवेश केला. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली देश आणि राज्याची दमदार वाटचाल सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वांवर  विश्वास ठेवून आणि भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांनी प्रेरित होऊन या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा मध्ये सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल आणि या परिसरातील कामे मार्गी लावण्यासाठी पक्ष तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.  

दरम्यान, बसवराज पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात भाजपाला १०० टक्के यश मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला. ठाकरे गटाचे नालासोपारा माजी जिल्हा प्रमुख पंकज देशमुख, माजी नगरसेवक व माजी उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील, विभाग प्रमुख संतोष राणे, रवि राठोड, शाखा प्रमुख धनाजी पाटील, वसई येथील ठाकरे गटाचे वसई शहर समन्वयक निलेश भानुशे, उपशहर प्रमुख प्रकाश देवळेकर आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. 

 

Web Title: congress uddhav thackeray group along with bahujan vikas aghadi face setback many leaders and office bearers from across the state join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.