Maharashtra Politics: “लोकशाहीत लोकांची हुकुमशाही असते, कोणत्या पंतप्रधानांची नसते”; प्रणिती शिंदेंची मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 19:57 IST2023-03-07T19:56:34+5:302023-03-07T19:57:26+5:30
Maharashtra Politics: काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो अभियाना’त सहभागी झालेल्या प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

Maharashtra Politics: “लोकशाहीत लोकांची हुकुमशाही असते, कोणत्या पंतप्रधानांची नसते”; प्रणिती शिंदेंची मोदींवर टीका
Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून हळूहळू तयारीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने भारत जोडो यात्रा यशस्वी करून दाखवल्यानंतर हाथ से हाथ अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस नेते सामान्य जनतेच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. या अभियानात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.
लोकशाही ही लोकांची शाही असते. लोकांची हुकूमशाही असते, कोणत्या पंतप्रधानांची हुकूमशाही नसते. आम्ही आमदार आमच्या घरी असतो, तुमच्यासाठी आम्ही नोकर आणि सेवकच असतो, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले. काही दिवसांनी आम्ही घरोघरी जाऊन कुणाचे रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, अपंग दाखला किंवा जन्म दाखला, अशी सगळी कामे करणार आहोत. हेच ते ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ आहे. निवडणुका असो वा नसो, काँग्रेस आणि आम्ही तळागाळात तुमच्यासोबत आहोत. तुमच्या सुख-दु:खात आम्ही सोबत असू, कदाचित निवडणुकांमध्ये आम्ही येणार नाही. पण सुख-दु:खात तुम्हाला जेव्हा मदत हवी असेल तेव्हा आम्ही मदतीला धावून येऊ, असे आश्वासन प्रणिती शिंदे यांनी दिले.
लोकांची हुकुमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची हुकुमशाही नाही
पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आम्ही मदतीला नाही आलो, तर आमचा कान धरून आम्हाला खाली बसवा. तो तुमचा अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा तो अधिकार आहे. कारण ही लोकांची शाही आहे, लोकशाही आहे. ही लोकांची हुकुमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची हुकुमशाही नाही. आम्ही तुमचे नोकर आहोत. मी आमदार माझ्या घरी असेन. पण इकडे आम्ही तुमचे सेवक आणि नोकर आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा मोठे नाहीत, हे तुम्ही कधी विसरू नका. घाबरू नका. ताठ मानेने जगा, असे प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"