'यामुळे' सातारा लोकसभा लढविण्यास पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडचे आदेश ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 13:05 IST2019-09-27T12:53:59+5:302019-09-27T13:05:22+5:30
पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडकडून त्यांना सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यात राजे आणि चव्हाण यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे.

'यामुळे' सातारा लोकसभा लढविण्यास पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडचे आदेश ?
- रवींद्र देशमुख
मुंबई - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने साडेतीनशे हून अधिक जागा जिंकल्या. सलग दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लोटेत काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेतेपदही मिळवता आलेले नाही. काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळवता आला. तर विरोधीपक्षनेते पदासाठी 55 जागांवर विजय मिळविणे आवश्यक आहे. आता काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी मास्ट्रर प्लॅन केल्याची शक्यता आहे.
सातारा मतदारसंघाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदार संघात पोट निवडणूक होणार आहे. साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्यामुळे या जागेवर पुन्हा राष्ट्रवादीकडूनच कोणीतरी राहिल, अशी शक्यता होती. तसेच साताऱ्यातून शरद पवार यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांची चर्चा जोरात सुरू होती. पण ऐनवेळी आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर येत आहे.
दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडकडून त्यांना सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यात राजे आणि चव्हाण यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला लोकसभेत विरोधीपक्षनेता पद मिळविण्यासाठी 55 चा आकडा गाठणे आवश्यक आहे. त्यामुळे देशात जिथे-जिथे पोट निवडणूक होईल, त्या जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट आहे. सातारा जिंकल्यास, काँग्रेसचे लोकसभेतील संख्याबळ 53 होणार असून आणखी दोन जागा जिंकल्यास, काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपद मिळू शकते. याआधी विरोधीपक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येणार असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होत्या. मात्र त्यात तथ्य निघाले नाही. परंतु, आता राष्ट्रवादी साताऱ्याची जागा काँग्रेसला देऊन विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेसला हातभार लावू शकते.