भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची ‘अर्धमैत्री’
By Admin | Updated: February 15, 2017 00:43 IST2017-02-15T00:43:31+5:302017-02-15T00:43:31+5:30
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाने इतर पक्षांमधील आजी व माजी नगरसेवकांसह ४० पेक्षा जास्त जणांना पक्षात देऊन राष्ट्रवादी

भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची ‘अर्धमैत्री’
पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाने इतर पक्षांमधील आजी व माजी नगरसेवकांसह ४० पेक्षा जास्त जणांना पक्षात देऊन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉँग्रेससमोर आव्हान उभे केले होते. मात्र, त्याला रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसने ८६ ठिकाणी आघाडी करत ‘अर्धमैत्री’ केली. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढती होत आहेत. शिवसेनेला अद्याप न गवसलेला सूर आणि सैरभैर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांच्या समीकरणावर महापालिकेतील सत्तेचे गणित ठरणार आहे.
महापालिकेत गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सत्तास्थापनेसाठी कॉँग्रेसबरोबर आघाडी केली तरी दोन्ही पक्षांतील मतभेद वारंवार उफाळून येत होते. यंदाच्या निवडणुकीतही उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस अगोदरपर्यंत दोन्ही पक्ष स्वबळाचाच नारा देत होते. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन काही जागांवर आघाडी केली. वादातील जागांवर मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. विविध पक्षांतील विद्यमान नगरसेवकांना प्रवेश दिला. मात्र, उमेदवारी देताना निष्ठावंतांना डावलले गेल्याचा आरोप झाला. त्यामुळे नव्या- जुन्यांचा मेळ घालण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीचीही आघाडी झाली असली तरी मते एकमेकांकडे वळतील का हा प्रश्न आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवतीत यश मिळविल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला होता. त्याचबरोबर पक्षांतरांमुळे ताकद वाढली होती. भाजपाने रिपाइंला १० जागा सोडून त्यांच्यासोबत युती केली होती, मात्र रिपाइंच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी परस्पर कमळ चिन्ह घेतल्याने वाद निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून कमळ चिन्ह घेतलेल्या दहाही उमेदवारांना निलंबित करून पुण्यातील युती तोडण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. रिपाइंने अचानक साथ सोडल्यामुळे त्यांची समजूत घालता येईल का? हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, गेल्या २५ वर्षांत प्रथमच भाजपा आणि शिवसेना वेगवेगळी लढत आहे. शिवसेनेला अद्याप सूर सापडलेला नाही. मात्र, काही प्रभागांमध्ये लक्षणीय मते घेण्याची शिवसेनेची क्षमता आहे. मनसे अद्याप पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरल्याचे वाटतच नाही. अद्याप या पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध झालेला नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकही सभा झालेली नाही. गेल्या वेळी मनसेने तब्बल २९ जागा जिंकून दुसरा क्रमांक मिळविला होता. मनसेच्या मतांमध्ये घट झाली तर ती कोणाकडे जाणार हा प्रश्न आहे.
पुणे महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक ४८ जागा जिंकत काँग्रेसकडून पालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर पाच वर्षांनी २०१२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये आणखी ७ जागांनी वाढ करीत ५५ जागा मिळवून पुन्हा राष्ट्रवादी सत्तेवर आली. राष्ट्रवादीने पालिकेवर सलग १० वर्षे सत्ता केली आहे. या दहा वर्षात केलेली विकासकामे पुढे करून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. एकेकाळी पुण्याचा कारभारी असलेल्या काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था मात्र बिकट झाली आहे. सध्या या पक्षाचे २८ नगरसेवक आहेत. शिवसेनेला मुंबईच्या नेतृत्वाकडून त्यांना पुरेशा प्रमाणात रसद मिळत नसल्याची नाराजी त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. मतदानाला आता अवघे ७ दिवस शिल्लक राहिले असल्याने सर्वच पक्षांच्या प्रचाराला जोर आला आहे.
-विजय बाविस्कर