“‘ते’ विधान तर गमतीत केले होते”; शिंदे-पवारांना ऑफर देण्यावरुन नाना पटोलेंचे घुमजाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 19:16 IST2025-03-16T19:12:57+5:302025-03-16T19:16:11+5:30

Congress Nana Patole News: काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर देण्याच्या भूमिकेवरून नाना पटोले यांनी यु टर्न घेतल्याचे सांगितले जात आहे.

congress nana patole take u turn on making an offer of cm post to eknath shinde and ajit pawar and said that statement was made in jest | “‘ते’ विधान तर गमतीत केले होते”; शिंदे-पवारांना ऑफर देण्यावरुन नाना पटोलेंचे घुमजाव

“‘ते’ विधान तर गमतीत केले होते”; शिंदे-पवारांना ऑफर देण्यावरुन नाना पटोलेंचे घुमजाव

Congress Nana Patole News: काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनाही मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर दिली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनीही सतर्क राहिले पाहिजे. आम्ही सोबत आहोत. आमच्याकडे त्यांनी यावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सध्या दोघांमध्ये मुख्यमंत्रि‍पदाची ओढ लागली आहे. काही दिवस एकाला, काही दिवस दुसऱ्याला या दोघांनाही मुख्यमंत्री बनवू. भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो असे नाना पटोले यांनी म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या, उलट-सुलट आरोप-प्रत्यारोप, चर्चा झाल्या. यानंतर मात्र आता नाना पटोले यांनी आपल्या विधानावरून यु टर्न घेतला आहे. 

मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ते वक्तव्य करण्याआधीच मी म्हटले होते की, बुरा ना मानो होली हैं, त्यानंतरच मी त्या गमतीदार विषयाला हात घातला. मी ते गमतीत म्हटले होते. काही लोक ते ऐकून गंभीर होत असतील तर त्यांनी गंभीर राहावे. होळी, धूलिवंदन अशा सणांच्या दिवशी आमच्या संस्कृतीत आपसातील मतभेद विसरून आम्ही एकत्र येतो. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी लोकांना न्याय मिळवून द्यावा, हा संदेश या सणाच्या निमित्ताने दिला. या सर्व राजकीय घडामोडींदरम्यान गंमत म्हणून मी ते वक्तव्य केले होते, असे सांगत नाना पटोले यांनी आपल्या विधानावरून माघार घेत घुमजाव केले.

आता जनतेच्या प्रश्नांवर भूमिका घ्यावी

थट्टेचा दिवस होता, थट्टा संपली. आता जनतेच्या प्रश्नांवर भूमिका घ्यावी. आमच्यासाठी शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना वीज नाही. ती समस्या हे सरकार सोडवू शकले नाही म्हणून या सरकारने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांची घोषणा केली. परंतु, ते पंप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. जनावरांचा हैदोस वाढला आहे. शेतांमध्ये, जंगलांमध्ये वाघ फिरत आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही, महागाई वाढली आहे, राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, सर्वसामान्य जनतेसमोर जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. काँग्रेसला या सर्वांची काळजी आहे. आम्ही ती भूमिका घेत आहोत. जनतेच्या प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून बोलत आहोत, असे नाना पटोले म्हणाले. 

दरम्यान, एकनाथ शिंदे पूर्वी काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यांची दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी चर्चा झाली होती. आज पटेल आपल्यात नाहीत. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्याची कल्पना आहे, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला होता. त्यानंतर विजय वडेट्टीवार म्हणाले की, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो.

 

Web Title: congress nana patole take u turn on making an offer of cm post to eknath shinde and ajit pawar and said that statement was made in jest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.