"शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल"; नाना पटोलेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 07:27 PM2022-08-14T19:27:09+5:302022-08-14T19:29:45+5:30

Congress Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खातेवाटपावरून निशाणा साधला आहे.

Congress Nana Patole Slams Eknath Shinde and BJP Devendra Fadnavis | "शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल"; नाना पटोलेंचा खोचक टोला

"शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल"; नाना पटोलेंचा खोचक टोला

Next

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप रविवारी जाहीर केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १० पेक्षा अधिक खात्यांचा कार्यभार असणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागासह सात खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. महिला व बाल कल्याण विभागाचा कार्यभार आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असणार आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याचा कार्यभार असेल. यानंतर खातेवाटपावरून काँग्रेसने शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 

"शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी खातेवाटपावरून निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहेत. "फडणवीसांनी अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली. शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल" असं पटोले यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच आणखी काही ट्विट करत भाजपावर देखील हल्लाबोल केला आहे. 

नाना पटोले यांनी "भाजपा सत्तेचा अमरपट्टा घातल्याप्रमाणे वावरत आहे, परंतु याची आंबट फळेच त्यांच्या वाट्याला येतील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायप्रक्रियेस होणारा विलंब ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे" असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे. खातेवाटपानंतर राष्ट्रवादीने शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. "शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली" असं म्हणत टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुख्यमंत्री मा.शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली आहेत. गृह, अर्थ, महसूल, वने, ग्रामविकास, सहकार, जलसंपदा व सर्व महत्त्वाची खाती भाजपाने आपल्याकडेच ठेवून शिंदे गटाला दुय्यम स्थान दिले आहे. शिंदे गटातील मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला?" असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. 

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. त्यानंतर खातेवाटप कधी होणार आणि कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं दिलं जाईल याबाबत चर्चा सुरू होत्या. दरम्यान, मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप रविवारी जाहीर केले आहे. खातेवाटपानुसार शिंदे यांच्याकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभागांची जबाबदारी असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. 
 

Web Title: Congress Nana Patole Slams Eknath Shinde and BJP Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.