उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा, काँग्रेस नेत्यांचे थेट भाष्य; म्हणाले, “घोषणेचे स्वागत...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:03 IST2025-01-24T16:02:30+5:302025-01-24T16:03:12+5:30

Congress Nana Patole News: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे यांनी केल्यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

congress nana patole reaction over uddhav thackeray announcement over contest election on its own | उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा, काँग्रेस नेत्यांचे थेट भाष्य; म्हणाले, “घोषणेचे स्वागत...”

उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा, काँग्रेस नेत्यांचे थेट भाष्य; म्हणाले, “घोषणेचे स्वागत...”

Congress Nana Patole News: आपण भ्रमात राहिलो म्हणून आपली फसगत झाली. तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा, आपल्याशी कपटाने वागणाऱ्यांना उचलून आपटण्याची हिंमत तुम्ही दाखवणार असाल, सूड घेणार असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मी एकट्याने लढल्याशिवाय राहणार नाही. महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्याच्या मनाप्रमाणे निर्णय घेईन, अशा शब्दांत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल भाष्य केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी अंधेरी येथे बोलत होते. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. 

एकीकडे महाविकास आघाडीतील धुसपूस सातत्याने उघड होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचा नारा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग येत आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काँग्रेस पक्ष आपला निर्णय घेईल

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचे स्वागत आहे. ते शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत व प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचे धोरण ठरवण्याचा अधिकार आहे त्यानुसार ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, ज्यावेळी या निवडणुका जाहिर होतील त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काँग्रेस पक्ष आपला निर्णय घेईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करण्याच्या अधिकार दोन्ही पक्षांना आहे. परंतु, दोन्ही पक्षांचे मेळावे पाहिले तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला अधिक लोकांची उपस्थिती होती. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले होते. आमच्यात स्वबळाच्या विषयासह इतर काही विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी त्यावर भाष्य केले. ते त्यांचे मत आहे. मात्र, त्यासाठी ते एकदम टोकाची भूमिका घेतील असे मला वाटत नाही, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. 

 

Web Title: congress nana patole reaction over uddhav thackeray announcement over contest election on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.