Congress Nana Patole News: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्रह्म मुहूर्तावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याबाबत तीव्र संवेदना व्यक्त केल्या. यावरून ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी संताप व्यक्त करत योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभारावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी एका महिन्यात पूर्ण करावी, असे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. चौकशी समितीचे अध्यक्ष व निवृत्त न्यायमूर्ती हर्षकुमार यांनी ही माहिती दिली. या समितीचे सदस्य प्रयागराजचा दौरा करणार आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी महाकुंभ नगरमध्ये आग लागून काही तंबू भस्मसात झाले. या घटनेत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.
भागवत यांनी मोदी-योगी यांचा राजीनामा का मागितला नाही
प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरला आहे, हा लोकांच्या श्रद्धेचा, भावनेचा व आस्थेचा विषय आहे. पण भाजपा सरकारने महाकुंभ मेळ्याचाही इव्हेंट केला आहे. व्हिआयपी कल्चर आणून मोदी-योगी यांचे मोठे बॅनर्स लावले आहेत. या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना होऊन अनेक भाविकांचा मृत्यू झाला. पण भाजपा सरकार कोरोनासारखा आताही मृतांचा आकडा लपवत आहे. योग्य माहिती बाहेर येऊ दिली जात नाही. शंकराचार्यांनी मुख्यमंत्री योगी यांचा राजीनामा मागितला आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली पण आरएसएस व सरसंघचालक यावर का बोलत नाहीत, सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी-योगी यांचा राजीनामा का मागितला नाही, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.
दरम्यान, महाकुंभातील दुर्घटनेवर अद्याप आरएसएसने वक्तव्य का केले नाही. हिंदू रक्षक आरएसएसने प्रश्न विचारला नाही. वास्तिकता पुढे येऊ नये म्हणून मीडियाला तिथे जाण्यास बंदी केली. संतांचे टेंट जळत आहे, काही तरी गडबड तिथे सुरू आहे. आरएसएस धार्मिक संस्था असून आमचा राजकारणाशी संबंध नाही, असे ते दावे करतात. पण भाजप राजकीय पक्ष असताना त्या पक्षाला मदत करण्यासाठी हे नेहमी समोर येतात. महाकुंभात भाजपने जो इव्हेंट उभा केला, त्यामुळे भाविकांचा मृत्यू झाला. या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार, आरएसएसने त्यावर खुलासा करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.