“महायुती सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग, ७० टक्के मंत्री डागी वृत्तीचे”; नाना पटोलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:36 IST2025-12-18T18:34:21+5:302025-12-18T18:36:34+5:30
Congress Nana Patole: या सर्वांची सार्वजनिक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

“महायुती सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग, ७० टक्के मंत्री डागी वृत्तीचे”; नाना पटोलेंची टीका
Congress Nana Patole: महायुती सरकारमध्ये भाजपाचे, शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे अनेक आमदार सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड करण्यात आली आहे. काम न करता पैसे घेतले गेले आहेत. त्यामुळे या सर्वांची सार्वजनिक चौकशी झाली पाहिजे. अधिकाऱ्यांवर नेमका कोणता दबाव टाकून आमदार निधीची ही अफरातफर करण्यात आली, हे या महायुतीच्या व्यवस्थेमुळेच झाले असल्याचे समोर येईल, असे काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सुनील केदार यांना जो न्याय लावला, तोच न्याय माणिकराव कोकाटे यांच्यावर का लावला जात नाही, या प्रश्नावर बोलाना नाना पटोले म्हणाले की, सुनील केदार यांना चुकीच्या प्रकरणात गोवून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. मात्र कोकाटे सभागृहात रमी खेळताना सापडले, त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुल ताब्यात घेतले, हे सर्व रेकॉर्डवर असतानाही या सरकारने त्यांना कृषिमंत्री आणि क्रीडामंत्री केले, तसेच त्यांची आमदारकी कायम ठेवली. हे सरकार निव्वळ द्वेषाचे राजकारण करत आहे. आज सरकारमधील ७० टक्के मंत्री डागी वृत्तीचे आहेत, त्यामुळे कुणाला कोणते पद दिले जाते यावर चर्चा करण्याची आमची गरज नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
या सरकारमध्ये आज ‘चोर-चोर मोसेरे भाई’ असे चित्र
धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली, तसेच सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत का, या प्रश्नावर नाना पटोले यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या पक्षातच नव्हे, तर भाजपामध्येही वेगवेगळे गट आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार फोडण्याची तयारी भाजपा करत आहे. ही बाब सर्वश्रुत आहे, यात काहीही नवीन नाही. पार्थ पवार प्रकरणात प्रकरण दाबण्यासाठी अधिकाऱ्यांचा कसा वापर करण्यात आला, त्यांना कशा प्रकारे बाहेर काढण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणातही तेच कसे झाले, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे या सरकारमध्ये आज ‘चोर-चोर मोसेरे भाई’ असे चित्र स्पष्टपणे दिसत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, सरकारने गोरक्षण करणाऱ्या संस्थांना २८० कोटी रुपयांचा निधी दिला. दहा ते पंधरा टक्के गोरक्षण संस्था चांगले काम करतात, त्याला आमचा विरोध नाही. मी हे विधानसभेतही स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र अनेक तथाकथित गोरक्षण संस्थांमध्ये पोलीस आणि गोरक्षक मिळून शेतकऱ्यांची लूट करत आहेत आणि शासनाची तिजोरीही रिकामी करत आहेत. गायींसाठी दररोज प्रत्येकी ५० रुपये सरकारकडून दिले जातात. भाजपच्या तथाकथित गोरक्षण संस्थांवर जनतेचा पैसा उधळला जात असून राज्य भकास केले जात आहे. हे सर्व राज्य बघत आहे. फक्त सिडकोच नव्हे, तर सर्वच विभागांत जनतेचे पैसे लुटून महायुतीचे नेते आपल्या लोकांचे खिसे भरत आहेत, या शब्दांत नाना पटोले यांनी निशाणा साधला.