Maharashtra Politics: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की, महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. त्यापूर्वीच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रित लढवित आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सकारात्मक आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
ठाकरे बंधू एकत्र आले, तर आम्हाला काही हरकत नाही, असे काँग्रेस नेते म्हणत आहेत, याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला. यावर बोलताना, मला माहिती नाही. ही नवीन माहिती आम्हाला तुम्ही देत नाही. आमची सविस्तर चर्चा होत असते. झालेली आहे. काँग्रेस नेते आणि आम्ही एकमेकांना अनेकदा भेटत असतो. आमचा संवाद चांगला आहे, संजय राऊत यांनी म्हटले. यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत काँग्रेस सकारात्मक दिसत असल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’
पुण्यात काँग्रेसच्या कार्यशाळेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, सध्यातरी आमच्या आघाडीत राज ठाकरे नाहीत. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही. निवडणुकीत आघाडी होऊसुद्धा शकते किंवा होणारही नाही. आम्ही बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ. उद्धव ठाकरे हे तर मनसेसोबतच्या युतीसाठी तयार आहेतच. आदित्य ठाकरे एकीकडे लोकशाही वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे म्हणतात, दुसरीकडे मनसे निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन वॉर्ड पद्धतीची मागणी करत आहे. कहानीमे कुछ तो गडबड है..., अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीवर बोलताना महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, त्या दोघांच्या युतीचा अद्याप निर्णय झालेला नाही. ते दोघेभाऊ एकत्र येत असतील तर त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. राज ठाकरेंबद्दल अद्याप निर्णय नाही. राज ठाकरे अद्याप मविआत नाहीत. त्या दोन भावांचा निर्णय झाला की, चर्चा करून काँग्रेस निर्णय घेईल.