"काय आनंदाची गुढी उभारायची, मी त्यात पडत नाही"; गुढीपाडव्याबाबत वडेट्टीवारांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 08:10 IST2025-03-31T07:54:30+5:302025-03-31T08:10:28+5:30

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गुढीपाडवा सणाविषयी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

Congress leader Vijay Wadettiwar controversial statement regarding Gudi Padwa | "काय आनंदाची गुढी उभारायची, मी त्यात पडत नाही"; गुढीपाडव्याबाबत वडेट्टीवारांचे वादग्रस्त विधान

"काय आनंदाची गुढी उभारायची, मी त्यात पडत नाही"; गुढीपाडव्याबाबत वडेट्टीवारांचे वादग्रस्त विधान

Vijay Wadettiwar on Gudi Padwa: रविवारी हिंदू नवर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला. गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी शोभायात्रा देखील काढण्यात आल्या होत्या. गुढीपाडवा निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलं होतं. एकीकडे हा उत्साह असताना दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक विधान केलं आहे. मी गुढीपाडव्याला गुढी उभारायच्या भानगडीत पडत नाही, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे आता वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कुस्ती कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हे धक्कादायक विधान केलं. गुढीपाडवा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा हा दुसरा दिवस असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे आम्ही आनंदाची गुढी का उभारावी असं वडेट्टीवारांनी म्हटलं.

"मी काही गुढी-बिढी उभारत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाल्याचा हा दुसरा दिवस आहे. आम्ही काय आनंदाची गुढी उभारायची. त्यामुळे मी या भानगडीत पडत नाही. ज्याला पडायचं आहे त्याला पडू देत," असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही, असाही सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. 

दरम्यान, एकीकडे वडेट्टीवारांनी असे विधान केले असताना त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन सकाळीच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची! नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, असे वडेट्टीवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.  

दुसरीकडे, दोन ते वर्षांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबासोबत गुढीपाढवा साजरा केल्याचा एका व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामुळे आता विजय वडेट्टीवार यांनी असे विधान का केले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय

Web Title: Congress leader Vijay Wadettiwar controversial statement regarding Gudi Padwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.