ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 13:55 IST2021-08-12T13:54:38+5:302021-08-12T13:55:22+5:30
PM Narendra Modi Praniti Shinde : देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधानच जबाबदार असल्याचा प्रणिती शिंदे यांचा आरोप.

ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर टीका
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. परंतु सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताना दिसत आहे. असं असलं तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली. देशातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंना पंतप्रधाननरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माध्यमांसमोर येण्यासाठी घाबरत आहेत. ते एकदाही माध्यमांसमोर आले नाही. ते केवळ मतदानाच्या वेळ समोर येतात आणि मतं मागतात. सध्या त्यांचं भूत वोटिंग मशीनमध्ये जाऊन बसलं आहे. हाताला मतदान केलं की ते भाजपला जातं. यापूर्वी शिक्का मारून करण्यात येणारं मतदान योग्य होतं. बॅलेट पेपर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत," असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
उजनीच्या पाण्यावरूनही शिंदे झाल्या होत्या आक्रमक
उजनी धरणाच्या पाणी प्रश्नानं चांगलाच पेट घेतला होता. उजनीतील ५ टीएमसी पाणी इंदापुराला घेऊन जाऊ दिले जाणार नाही. ‘प्राण जाये, पर पाणी न जाये’, अशी भूमिका यापूर्वी प्रणिती शिंदे यांनी घेतली होती. त्यानंतर काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष पेटतो की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु सोलापुरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर उजनी धरणातील पाण्याचा आदेश रद्द करण्यात आला होता.