काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 07:36 IST2025-12-18T07:36:07+5:302025-12-18T07:36:45+5:30
उद्धवसेना व मनसेत सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. एक-दोन दिवसांत सर्व बाबी निश्चित झाल्यावर घोषणा केली जाईल.

काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेससोबत लढविण्याची उद्धवसेनेची इच्छा असली, तरी स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी केली आहे. दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वानेही आघाडीचा निर्णय घेण्याचा अधिकार मुंबईतील पदाधिकाऱ्यांना दिल्याने पुढील चर्चा होणार नाही. आता उद्धवसेना व मनसेची आघाडी असेल. तसेच, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशीही चर्चा केली जाईल, असे उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी बुधवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
उद्धवसेना व मनसेत सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. एक-दोन दिवसांत सर्व बाबी निश्चित झाल्यावर घोषणा केली जाईल. सत्ताधारी महायुतीमध्ये सुरू असलेला विसंवाद व गोंधळ आमच्यामध्ये नाही. युतीची घोषणा संयुक्तपणे होईल, असे त्यांनी सांगितले.
उद्धव व राज यांच्या संयुक्त सभा मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे आणि इतर भागांतही होतील. शिवाजी पार्कवरील सभेसाठी शिंदेसेना, मनसे व उद्धवसेनेने अर्ज केले आहेत. ठाकरे कुटुंबाचे शिवतीर्थाशी भावनिक, ऐतिहासिक संबंध असून, शिंदेसेनेचा शिवतीर्थाशी संबंध काय आहे? असा सवाल त्यांनी केला.
अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा संसदबाहेर १९ डिसेंबरला एपस्टाइनप्रकरणी भारतासंदर्भात काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपची मोठी फजिती होणार आहे, असा दावा राऊत यांनी केला.
भाजपने राष्ट्रभक्तीचे आता ढोंग करू नये
अजित पवार गटाने नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा निर्णयाला भाजपने विरोध केला आहे. मलिक हा पवारांचा अंतर्गत विषय आहे. पण, मलिक यांच्या कन्येने सत्ताधारी पक्षाला दिलेला पाठिंबा चालतो. त्यामुळे भाजपने राष्ट्रभक्तीचे ढोंग करू नये, अशी टीकाही खा. संजय राऊत यांनी केली.