“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 14:42 IST2025-11-26T14:41:52+5:302025-11-26T14:42:15+5:30
Congress Harshwardhan Sapkal: ऐन निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला अपहरण करून मारहाण होते, हे काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.

“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal: अहिल्यानगर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आलेली घटना अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे. संविधान दिनाच्या दिवशी भाजपाने सकाळी लोकशाहीची हत्या केली आहे. २६-११ च्या दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला होता तोच मुहूर्त साधून अहिल्यानगर जिल्ह्यात लोकशाहीचा खून पाडला आहे. ऐन निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला अपहरण करून मारहाण होते, हे काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नगर जिल्ह्यात घडलेली ही घटना अत्यंत निषेधार्ह व गंभीर आहेच परंतु महाराष्ट्रात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित करणारी आहे. भाजपा सरकारने आपले कारनामे दाखवायला सुरुवात केली आहे. नगरमध्ये झालेली ही काही पहिलीच घटना नाही. नगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काँग्रेसच्या दोघांना याआधी रात्री अटक करून कस्टडीत टाकण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली, त्यानंतर पोलीसांनी त्यांच्या गाडीतून या दोघांना भाजपाचा माजी खासदार सुजय विखे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे घेऊन गेले, त्यांना दमदाटी करण्यात आली, हा सर्व प्रकार चित्रपटात दाखवतात तसा आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
दरम्यान, फडणवीसांना दरिंदा म्हटले ते त्यांच्या बगलबच्च्यांना मिरच्या झोंबल्या. पण आम्ही जे बोललो ते योग्यच होते ही अहिल्यानगरच्या घटनेने ते पुन्हा एकदा दाखवूनही दिले आहे. भाजपाला लोकशाही व संविधान मान्य नसून ठोकशाही सुरू केली आहे. विरोधी पक्षाने निवडणूका लढवायच्या की नाही, असा प्रश्न या घटनेवरून उपस्थित होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुंड बगलबच्यांना आवर घालावा, सत्तेचा माज उतरायला वेळ लागत नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.