“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:28 IST2025-09-19T17:25:27+5:302025-09-19T17:28:10+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: काँग्रेस पक्षाची नेहमीच संविधान रक्षणाची भूमिका राहिली आहे. रा. स्व. संघाला संविधान भेट देणार, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता व सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्वीकारावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारताचे संविधान ही ऐतिहासिक घटना असून संविधान भारताची प्रेरणा आहे. संविधान हे मनुस्मृतीवर आधारीत असावे, अशी रा. स्व. संघाची अपेक्षा होती, गोलवलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तसे पत्र पाठवले होते. पण आम्ही विशिष्ट लोक हा संघाचा विचार आहे तर संविधानाचा विचार हा आम्ही भारताचे लोक असा आहे. गोलवलकर यांचे बंच ऑफ थॉट हे रा. स्व. संघ व भाजपाचे बायबल आहे. संविधान नाकारणारा विचार भाजपाचा आहे. स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्ष रा. स्व. संघाने त्यांच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा सुद्धा फडकवला नव्हता. आता शंभर वर्ष होताना संघाने विखारी व विषारी विचार सोडून संविधानाचा विचार स्वीकारला पाहिजे असे सपकाळ म्हणाले.
रा. स्व. संघाला संविधान भेट देणार
काँग्रेस पक्षाची नेहमीच संविधान रक्षणाची भूमिका राहिली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या पुढाकाराने २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान संविधान सत्याग्रह यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा नागपूरच्या दिक्षाभूमीपासून सुरु होऊन सेवाग्रामपर्यंत जाणार आहे. २८ तारखेला महान क्रांतीकारी भगतसिंह यांच्या बलिदानदिनी मशाल मोर्चा काढला जाणार आहे तसेच नागपूरच्या संविधान चौकात एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २९ तारखेपासून यात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी रा. स्व. संघाला संविधान भेट देणार असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
दरम्यान, पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक हरिश केणी, रविकांत म्हात्रे, कैलास घरत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.