“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:47 IST2025-12-19T15:44:15+5:302025-12-19T15:47:23+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: नवी मुंबई विमानतळाचा उल्लेख सध्या एनएम विमानतळ असा केला जात आहे. हे एनएम म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे तर नाही ना, असा संशय हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: नवी मुंबईविमानतळाला भूमिपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे. या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नवी मुंबईच्या विकासासाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या. त्यावेळी भूमिपुत्राच्या हक्कांसाठी दि. बा. पाटील यांनी दीर्घ लढा दिला. १२.५ टक्के योजना ही दि. बा. पाटील यांच्या आंदोलनामुळेच शक्य झाली आहे. दि. बा. पाटील यांची आमदार व खासदार अशी प्रदिर्घ राजकीय कारकिर्द राहिली आहे. नवी मुंबईत, जेएनपीटी, नैना प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ विकसीत होत असताना भूमिपुत्रांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त असून जनभावनेचा आदर केला पाहिजे, असे सपकाळ यांनी सांगितले.
एनएम म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे तर नाही ना...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांचा कावा सर्वांना माहित आहे. ‘फडणविसांचा कावा ना कळे ब्रम्हदेवा’, असा आहे, असे सपकाळ म्हणाले. नवी मुंबई विमानतळाचा उल्लेख सध्या एनएम विमानतळ असा केला जात आहे. विमानतळाच्या कुंपनाच्या भिंतीवरही एनएम अक्षरे कोरली जात आहेत. हे एनएम म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे तर नाही ना असा दाट संशय बळावत चालला आहे. अहमबादच्या क्रिकेट स्टेडियमचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलून नरेंद्र मोदी यांचे दिले आहे, पण असा कोणताही कावेबाज पणा भाजपा वा देवेंद्र फडणवीस यांनी करु नये. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी या प्रश्नी आवाज उठवला आहे, राज्यसभेतही ही मागणी लावून धरली जाईल, असे सपकाळ म्हणाले.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा होऊन तीन दिवस झाले पण अद्याप त्यांची आमदारकी रद्द केली नाही व अटकही केलेली नाही. लिलावती रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे, आणि चोराच्या दिमतीला पोलीस ठेवले आहेत. शिक्षा ठोठावताच तात्काळ कारावई केली पाहिजे होती पण कारवाई ही फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच केली जाते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.