“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:20 IST2025-04-19T17:18:16+5:302025-04-19T17:20:35+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून राज्य कारभार सुरू आहे. सर्व समाज घटक दबावाखाली, भीतीखाली जगत आहे, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: आज संविधान, अल्पसंख्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतील लोक भीती दाखवत आहोत, घाबरवत आहेत. अल्पसंख्याक समाजात भीती आहे, शेतकऱ्यांमध्ये भीती आहे, बेरोजगार तरुणही भीतीत वावरत आहेत, महिला भीतीत आहे कारण घराबाहेर पडले तर सुरक्षित राहू शकेन की नाही याची तिला भीती वाटत आहे. गृहिणी भीतीत जगत आहेत कारण महागाईने जगणे कठीण करून ठेवले आहे. बहुजन भीतीत जगत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे शिवभक्तांमध्येही भीती आहे. बहुसंख्य समाजाने अल्पसंख्याकांचे रक्षण केले पाहिजे. पण देशातील परिस्थिती वेगळी आहे. या परिस्थितीचा सामना करायचा असेल तर एकता व अखंडतेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यांनी केला.
एका कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून राज्य कारभार सुरु आहे. आज सर्व समाज घटक दबावाखाली, भीतीखाली जगत आहे. सत्तेतील लोक घाबरवण्याचे काम करत आहेत. याला न डगमगता एकता व अखंडतेची मशाल हाती घेऊन पुढे जाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत दिलेल्या ‘डरो मत’ संदेश अंमलात आणू, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
सर्वांना सोबत घेऊन जाण्याची गरज आहे
सर्वांना सोबत घेऊन जाण्याची गरज आहे. समाजासमोर जे आव्हान उभे ठाकले आहे त्यातून मार्ग काढायचा असेल तर एकत्र आले पाहिजे. आणि आपला विचार बदलला पाहिजे. नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दिशाओं को बदलो तो किनारे बदल जाते हैं। अशा अंदाजात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका मांडली.
दरम्यान, उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपा महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. भाजपा व महायुती महाराष्ट्राच्या मुळावर उठली आहे. भाजपा महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे ते महाराष्ट्र धर्माचे नुकसान करत आहेत. शिव, शाहु, फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या राज्यात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा आहे. पण भाजपा मात्र महाराष्ट्राची भाषा व संस्कृती तोडण्याचे काम करत आहे. याला राज ठाकरे यांच्या विचारातून दुजोरा मिळत आहे. आम्ही भारत जोडोवाले आहोत, कुटुंब फोडणारे नाही. दोन परिवार एकत्र येत असतील तर आक्षेप घेण्याची गरज नाही, जोडले जात असतील तर स्वागतच आहे, असे सपकाळ म्हणाले.