“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:19 IST2025-09-18T18:16:29+5:302025-09-18T18:19:18+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: जीएसटीमध्ये सुधारणा करा असे राहुल गांधी यांनी ८ वर्षापूर्वीच जाहीरपणे सांगितले होते. सरकार उशिराने का होईना जागे झाले आणि त्यांना सुधारणा करावी लागली.

“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
Congress Harshwardhan Sapkal News: मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावेत. शेतपिकाबरोबरच लाखो एकर शेतजमीन खरडून गेली आहे त्यापोटी हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. आताचा हंगाम पूर्ण वाया गेला असल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्यावीत आणि शेतकर्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघात मतचोरी कशी करण्यात आली हे काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. आता मतचोरीचा आणखी एक बॉम्ब राहुल गांधी यांनी फोडला आहे. चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघाच्या मतदारयादीत कसा घोटाळा केला? हे आज उघड केले. निवडणूक आयोग दुटप्पीपणा करत असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरीवर स्पष्ट उत्तर न देता राजकीय पक्षाच्या नेत्याप्रमाणे बोलत आहेत. मतचोरी करून भाजपा व नरेंद्र मोदी यांना भारताचा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश करायचा आहे, असा गंभीर आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
जीएसटी सुधारणा हा राहुल गांधींचा विजय
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वारंवार केंद्र सरकारची पोलखोल केली असून नोटबंदी, कोरोना संकटावरही त्यांनी मोदी सरकारला धोक्याचा इशारा दिला होता पण मोदी सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागली आहे. जीएसटीमध्ये सुधारणा करा असे राहुल गांधी यांनी ८ वर्षापूर्वीच जाहीरपणे सांगितले होते. सरकार उशिराने का होईना जागे झाले आणि जीएसटीमध्ये त्यांना सुधारणा करावी लागली. जीएसटीमधील सुधारणा हा राहुल गांधी यांच्या दूरदृष्टी विचाराचा मोठा विजय असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस २२ सप्टेंबर रोजी राज्यभर दुकानदार, व्यापारी आस्थापने येथे पेढे वाटून साजरा करणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत असून मराठी भाषा ही केवळ भाषा नसून महाराष्ट्र धर्म व संस्कृती आहे. तिसरी भाषा लादून देवेंद्र फडणवीस मराठीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत. मराठी भाषेसह सर्व भाषा गुण्यागोविंदाने नांदल्या पाहिजेत, विविधेत एकता ही भारताची ओळख आहे ती टिकली व जपली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. पण भाजपा मात्र ही ओळख पुसण्याचे काम करत आहे. डॉ. नरेंद्र जाधव समिती ही हिंदी भाषा लादण्यासाठी गठीत करण्यात आली आहे. समितीचा निर्णय काहीही येवो भाषेची सक्ती लादू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिला आहे.