“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 16:36 IST2025-07-22T16:36:39+5:302025-07-22T16:36:49+5:30

Congress Harshwardhan Sapkal: माणिकराव कोकाटेंचा तातडीने बंदोबस्त करा व नारळ देऊन घरी पाठवा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

congress harshwardhan sapkal said does cm devendra fadnavis not have the courage to expel minister manikrao kokate | “माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ

“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय?, असा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एक-एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर त्यांनी सरकारच भिकारी आहे हे सांगून असंवेदनशीलतेचा कळस केला आहे. अशा मंत्र्याला एक मिनिटही पदावर ठेवण्याची गरज नाही पण मुख्यमंत्री त्याला का पाठिशी घालत आहेत? कोकाटेंची हकालपट्टी करण्याची फडणवीस यांच्यात हिंमत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, कोकाटे हे विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचे व्हिडिओ प्रसार माध्यमासह समाज माध्यमांवरही सर्वांनी पाहिले आहेत. शेतकरी अडचणीत आहे, अवकाळी पावसाने झालेली नुकसान भरपाई दिलेली नाही. शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीचे आश्वासन देऊनही त्याचा निर्णय होत नाही, राज्याच्या काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा अनेक संकटाचा सामना शेतकरी करत असताना त्याकडे कोकाटे गांभिर्याने पाहत नाहीत, असेच त्यांच्या कामावरून व बेताल वक्तव्यावरून दिसत आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जातो त्याची तरी काळजी करा

शेतकऱ्याला भिकारी म्हणालो नाही तर ‘सरकारच भिकारी आहे’, राजीनामा दयायला मी काय विनयभंग केला आहे का? अशी मुक्ताफळे उधळून हे महाशय आपण काहीच चुकलो नाही असे बिनधास्त सांगत आहेत. हा प्रकार निर्लज्जपणाचा कळस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ते जुमानत नाहीत असे त्यांच्या विधानांवरून दिसत आहे. अशा मुजोर मंत्र्याला तात्काळ घरचा रस्ता दाखवला पाहिजे पण तसे होत नाही हे पाहता फडणवीस यांची काही तरी मजबुरी असेल म्हणून ते कारवाई करण्याची हिम्मत दाखवत नाहीत. कारण काहीही असो अशा व्यक्तीमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जातो त्याची तरी काळजी करा, असे सपकाळ म्हणाले.

दरम्यान, सातत्याने वादग्रस्त विधाने करून माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाची प्रतिमा मलीन केली आहे. अशा व्यक्ती मंत्रिपदावर राहणे राज्याच्या व शेतकऱ्याच्या हिताचे नाही. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण हे चिंताजनक असून महाराष्ट्राला ते भूषणावह नाही, त्यामुळे कोकाटेंचा तातडीने बंदोबस्त करा व नारळ देऊन घरी पाठवा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 

Web Title: congress harshwardhan sapkal said does cm devendra fadnavis not have the courage to expel minister manikrao kokate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.