Congress Harshwardhan Sapkal News: निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दाव्यांबाबत वाद वाढत असतानाच काँग्रेसने एक वेब पेज सुरू केले आहे. तेथे मतचोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाला उत्तरदायी करण्याच्या मागणीसाठी व डिजिटल मतदार यादी देण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लोकांना नोंदणी करता येणार आहे. मतचोरी प्रकरणी इंडिया आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, विरोधी पक्षाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढला. यातच संपूर्ण देशभरात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या केलेल्या पोलखोलची चर्चा सुरू असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
मतचोरीच्या मुद्द्यावरुन सध्या देशातील राजकारण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अनियमिततेबाबत गंभीर आरोप केले आहेत. यावरुन आज राहुल यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकरल्यामुळे सर्व आंदोलक खासदारांना रोखण्यात आले. यातच मतचोरी प्रकरणी संपूर्ण देशातील जनता राहुल गांधी यांच्यासोबत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मुंबई लोकलमधील एक प्रवासी राहुल गांधीचे म्हणणे ऐकत असल्याचे दिसत आहे. मतचोरी विरोधात देशातील जनता राहुल गांधींसोबत आहे. राहुल गांधी जे बोलतात, ते आज संपूर्ण देश कान लावून ऐकतो आहे. मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करणारा एक तरुणही, मतचोरीबाबत राहुलजी जे सांगताहेत ते आपल्या मोबाईलवर लक्षपूर्वक पहात आहे. भाजप आणि निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा त्यांनी केलेला भांडाफोड हा देशभरात चर्चेचा विषय बनला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मतदार यादीतील अनियमिततेवरुन विरोधकांनी हा लढा सुरू केला आहे. राहुल गांधींसह सर्व विरोधी नेते निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल यांनी निवडणूक आयोगावर थेट मत चोरीचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी काल एक मोहीमही सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल यांनी एक वेबसाइटही सुरू केली आहे. यासोबतच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केले आहे.