“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 16:18 IST2025-05-04T16:18:04+5:302025-05-04T16:18:29+5:30

Congress News: सत्ताधारी लोक राजकीय फायद्यासाठी सामाजिक वातावरण बिघडवत असल्याची टीका करण्यात आली आहे.

congress harshwardhan sapkal said bjp mahayuti government gave empty promises and deceived the people in 100 days | “भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

Congress News: भाजपा युती सरकारच्या १०० दिवसांचे रिपोर्ट कार्ड सरकारने जाहीर करून गवगवा केला पण भाजपा युती सरकारच्या १०० दिवसात राज्याला काय मिळाले तर आका, खोके हे शब्द मिळाले आणि दुर्दैवाने हे दोन्ही शब्द बीड जिल्ह्यातून राज्याला मिळाले. राज्यात महिला अत्याचार वाढले आहेत, शेतमाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिलेल्या सरकारने आता आम्ही असा शब्द दिलाच नाही असा पवित्रा घेतला आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे तर लांबच राहिले १५०० रुपयेही दिले जात नाहीत. भाजपा युतीने निवडणुकीवेळी जनतेला दिलेला शब्द पाळला नाही. अवघ्या १०० दिवसात भाजपा युतीने जनतेची घोस फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात महाराष्ट्र धर्मावर होणारे आक्रमण हा चिंतेचा व गंभीर प्रकार आहे. हे आक्रमण थोपवून महाराष्ट्र धर्म वाचवण्याची गरज आहे. संतोष देशमुखांसारख्या सरपंचाची हत्या करण्यात आली. आपल्याच जातीच्या माणसाकडून दुकानातून माल खरेदी करा असे सांगितले जाते, हे विदारक चित्र वाढीस लागले आहे हे दुर्दैवी आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 

नवा अवतार राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल

भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सत्ताधारी लोक राजकीय फायद्यासाठी सामाजिक वातावरण बिघडवत असताना काँग्रेस पक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली सद्भावना व सौहार्द वाढवण्याचे काम करत आहे. जनतेला लुबाडून उद्योगपती आणि ठेकेदारांची घरे भरण्याचे काम सुरु आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्ताने शेतक-यांच्या सुपीक जमिनी हडपण्याचा सरकारी डाव आहे पण काँग्रेस तो यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केला.

 

Web Title: congress harshwardhan sapkal said bjp mahayuti government gave empty promises and deceived the people in 100 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.