“भाजपाला दुसऱ्या पक्षातील नेते, पदाधिकारी खाण्याचा रोग जडलाय”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:05 IST2025-07-16T17:05:14+5:302025-07-16T17:05:29+5:30
Congress Harshwardhan Sapkal: जे पक्ष सोडून गेले त्यांना जनता व पक्षाचे कार्यकर्तेच जाब विचारतील, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

“भाजपाला दुसऱ्या पक्षातील नेते, पदाधिकारी खाण्याचा रोग जडलाय”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal: भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे ५६ इंच छातीचे नेतृत्व असून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात पण तो दावा पोकळ आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव आणून, धमक्या देऊन भाजपात घेत आहेत. भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या पक्षातील लोक खाण्याचा रोग जडला आहे, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष नेत्यांचा नाही तर विचाराचा पक्ष आहे, सर्वांना सोबत घेऊ जाणारा पक्ष आहे. कोणी पक्ष सोडून गेल्याने पक्षाची ताकद कमी होत नाही. पुणे जिल्ह्यात काँग्रसे पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली नसली तरी आगामी काळात नक्कीच यात बदल होईल. जे लोक ठरवून पक्ष सोडून जातात त्यांना थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीत. काँग्रेस पक्षाने ज्यांना आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री पद दिले त्यांनीही पक्ष सोडला. पक्ष सोडणारे आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत आहेत पण असा अन्याय आपल्यावरही व्हावा अशी भावना पदाधिकारी बोलून दाखवत आहेत. जे पक्ष सोडून गेले त्यांना जनता व पक्षाचे कार्यकर्तेच जाब विचारतील, असेही सपकाळ म्हणाले.
दारु परवाने कंपन्यांसाठी खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री
राज्यात दारू दुकानांचे परवाने काही कंपन्यांना देण्याचा प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, हे दारु परवाने खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री आहेत. तेच उत्पादन शुल्क खात्याचे मंत्रीही आहेत. टँगो नावाचा ब्रँड कोणाचा आहे हे सर्वांना माहित आहे. यात Conflict of interest स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे त्यांच्याकडून उत्पादन शुल्क खाते काढून घ्यावे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात टिळक कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्नतीत आणि ‘केसरी’च्या माध्यमातून सामाजिक भान निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते असे म्हटले आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते.