“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:18 IST2025-12-12T17:17:40+5:302025-12-12T17:18:43+5:30
Congress Harshwardhan Sapkal: हिवाळी अधिवेशन अवघे एक आठवड्याचे घेऊन भाजपा महायुती सरकारने विदर्भ कराराचा अनादरच केला आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal: नागपूरचे हिवाळी अधिवेशन अवघे एक आठवड्याचे घेऊन भाजपा महायुती सरकारने विदर्भ कराराचा अनादरच केला आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार महिला सुरक्षा यासारखे असंख्य प्रश्न असताना अधिवेशनात त्यावर चर्चा होत नाही आणि कुठे कुत्री पकडा, बिबटे सोडा यावर चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षाला अधिवेशनाचे काही गांभीर्य राहिलेले नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज भ्रष्टाचाराची एक एक प्रकरणे उघड होत आहेत. पैशांचा सुळसुळाट सुरु आहे. भ्रष्टाचार हेच सरकारचे ब्रिद वाक्य आहे. ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’, पासून झालेली सुरुवात आता ‘मिल बाट के खायेंगे’ पर्यंत आली आहे. राज्यातील भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका काढून त्यावर चर्चा झाली पाहिजे पण सत्ताधारी पक्षच सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देत नाहीत. गंभीर विषय सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य विनोद करत असतात. लोकशाहीचा कटेलोट होताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षातीलच काही सदस्य भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, सरकारने आतातरी डोळे उघडावे, या शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला.
विरोधी पक्षनेत्याचा निर्णय का घेतला जात नाही?
विरोधी पक्ष नेते पदाबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदासाठी १० टक्के सदस्यसंख्येचा दाखला दिला जात आहे, असे असेल तर वरच्या सभागृहात १० टक्के सदस्यसंख्या आहे व सरकारला प्रस्तावही दिलेला आहे. मग तेथे विरोधी पक्षनेत्याचा निर्णय का घेतला जात नाही? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
दरम्यान, लोकशाही व्यवस्थेत काही प्रथा, परंपरा व संकेत पाळले जातात. दोन्ही सभागृहाचे प्रस्ताव आहेत पण सरकारला संविधानानुसार कामकाज करायचे नाही. हम करोसे कायदा पद्धतीने कामकाज रेटले जात आहेत. सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची बूज राखली पाहिजे. ते एवढा आव आणत असतात पण हा आव आणत असताना त्यांनी संकेत, नियम पाळले पाहिजेत. विरोधी पक्षनेतेपद देणे हा राजधर्म आहे पण सरकार त्यापासून पळ काढत आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली.