“कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का?”; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:48 IST2025-04-01T16:46:14+5:302025-04-01T16:48:29+5:30

Congress Harshwardhan Sapkal News: विरोधकांवर कारवाई करण्यात सरकार तत्पर, गुन्हेगार मात्र मोकाट, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

congress harshwardhan sapkal criticized state govt over police issue notice to audience in kunal kamra show | “कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का?”; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका

“कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का?”; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका

Congress Harshwardhan Sapkal News:काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता, मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असे पण देवेंद्र फडणवीसांकडे गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात पोलीस स्टेट आणण्याचा प्रयत्न आहे असे स्पष्ट दिसते, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

एका विनोदी कलाकाराने राजकीय नेत्यावर काही विनोद केला तर त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करायला हवा, त्याकडे एक विनोद म्हणूनच पहायला हवे. देशाचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. मनमोहनसिंह तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर अत्यंत जहरी विनोद केले गेले पण त्यासाठी कलाकार वा कोणा प्रेक्षकांना अशा पद्धतीने वेठीस धरले नाही. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नसतानाही त्यांच्या पक्षाने तोडफोड करणे, कामराला धमकी देणे असे प्रकार सुरु आहेत. प्रेक्षकांनी कार्यक्रम पाहिला यात त्यांचा काय दोष? कामराला धमकी देणारे, स्टुडिओची तोडफोड करणारे मोकाट आणि कार्यक्रम पाहणाऱ्यांना पोलीसांचा जाच हा कसला न्याय? महाराष्ट्राला पोलीस स्टेट बनवण्याचा हा उद्योग त्वरित थांबवावा. राज्यातील सरकारची कार्यपद्धती ही चोर सोडून संन्याशाला फाशी देणारी आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 

राज्यात सेलिब्रिटीपासून सरपंचापर्यंत कोणीही सुरक्षित नाही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा युतीचे सरकार येऊन तीन महिने झाले, या तीन महिन्यात बीड व परभणीत हत्या झाल्या, सेलिब्रिटींना धमक्या येत आहेत, अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून जीवघेणा हल्ला झाला. स्वारगेटच्या बस स्थानकात महिलेवर अत्याचार झाला, राज्यात सेलिब्रिटीपासून सरपंचापर्यंत कोणीही सुरक्षित नाही. कोयता गँग, आका, खोक्या अशा गँग उघडपणे क्राइम करत आहेत. पण गृहखाते व पोलीस विभाग ही गुन्हेगारी रोखू शकत नाही. पुण्यासारख्या शहरांपासून धारशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत ड्रग्ज खुलेआम विकले जाते त्यावर आळा घालता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर वचक नाही, असा दावा सपकाळ यांनी केला.

दरम्यान,  फडणवीसांचे पोलीस फक्त विरोधकांवर कारवाया करणे, विरोधकांचे फोन टॅप करणे, लोकशाही मार्गाने आंदोलन करु न देणे व सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे मंत्री थेट धमक्या देतात पण गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. गृहमंत्री व पोलीस महासंचालक ही दोन्ही पदे शोभेच्या बाहुल्या बनल्या आहेत. फडणविसांना गृहविभागाला वेळ देता येत नाही, त्यांना अतिरिक्त काम झेपत नाही, त्यांनी राज्याचे हित लक्षात घेऊन पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री नेमावा व मुदतवाढ दिलेल्या पोलीस महासंचालकांना सन्मानाने निवृत्त करून नविन सक्षम निष्पक्षपाती अधिकाऱ्याची पोलीस महासंचालक पदी  नियुक्ती करावी असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 

Web Title: congress harshwardhan sapkal criticized state govt over police issue notice to audience in kunal kamra show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.