छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:32 IST2025-06-06T15:30:19+5:302025-06-06T15:32:05+5:30

Congress Harshwardhan Sapkal News: छत्रपती शिवाजी महाराज व शिवप्रेमींचा अपमान करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

congress harshwardhan sapkal criticized state bjp mahayuti govt over chhatrapati shivaji maharaj rajyabhishek issue | छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News:छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्मांच्या लोकांना समान स्थान होते. सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना संविधानात आहे, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते. पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती महाराष्ट्रात आहेत. भाजपाचे सरकार असतानाच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तीचा आतापर्यंत समूळ नायनाट केला नाही पण आता मात्र या प्रवृत्तींचा कडलोट करा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, पुण्यातील शिवसृष्टीवर कुलकर्णी नावाच्या एका विकृताने लघुशंका केली. त्यावेळी त्याची पत्नी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारे, तुकारामाची गाथा बुडवणारे, काळाराम मंदिरातील प्रवेशाला विरोध करणाऱ्या ह्याच प्रवृत्ती आहेत आणि ते महाराष्ट्र नासवण्याचे काम करत आहेत. पण दुर्देवाने त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. भाजपा सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम सुरू आहे. महाराजांचा अवमान करणारे कोरटकर, सोलापूरकर, कुलकर्णी यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही? भाजपाच्या राज्यात या प्रवृत्तींना पाठबळ दिले जाते, सुरक्षा पुरवली जाते व पुरस्कार देऊन सन्मानही केला जातो हे संताप आणणारे आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 

शिवप्रेमींचा अपमान करणाऱ्या योगींनी व मोदींनी जाहीर माफी मागावी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी होते, असा खोटा इतिहास योगी सांगत आहेत. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, पण जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. ह्याच योगी आदित्यनाथ यांनी महाराजांचा जिरेटोप घालून शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. या जिरेटोपाला अनन्यसाधारण महत्व आहे. पण भाजपाचे नेते सातत्याने जिरे टोप घालून महाराजांचा अपमान करत आहेत, याआधी पंतप्रधान मोदी यांनीही जिरेटोप घातला होता. जिरेटोप घालून छत्रपती शिवाजी महाराज व शिवप्रेमींचा अपमान करणाऱ्या योगींनी व मोदींनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ केली. 

दरम्यान, ब्राह्मण समाजासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान एकांगी आहे. फक्त ब्राह्मण समाजच साखरेचे काम करत नाही तर समाजातील सर्व जाती महाराष्ट्र धर्मात अमृत ओतण्याचे काम करतात, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत सर्व जाती धर्मांच्या लोकांनी योगदान दिलेले आहे. ही कोणत्या एका जातीची ठेकेदारी नाही तर अठरापगड जातींचे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरु, शास्त्री, इंदिरा गांधी, पी.व्ही. नरसिंहराव यांची जात सांगण्याची वेळ आली नाही, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

 

Web Title: congress harshwardhan sapkal criticized state bjp mahayuti govt over chhatrapati shivaji maharaj rajyabhishek issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.