“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 08:06 IST2025-11-05T08:05:09+5:302025-11-05T08:06:03+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत असून, जबाबदारीपासून पळ काढला आहे. आता जनताच धडा शिकवेल, अशी टीका करण्यात आली.

“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरूस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करणे हे योग्य नाही. निवडणूक आयोग दुबार तिबार मतदारांच्या नावासमोर ‘स्टार’ करणार हे सांगत असले तरी ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. आयोगाचा हा कारभारच ‘दस नंबरी’ असून ते सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
मतदार याद्यातील घोळ, दुबार मतदार, चुकीचे पत्ते लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच घेण्यात याव्यात, अशी मागणी विरोधक करत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी (एकूण २८८) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान; तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यावरून आता विरोधकांकडून निवडणूक आयोगावर टीका होऊ लागली आहे.
आता जनताच धडा शिकवेल
मतचोरी करून भाजपाचे सरकार आलेले आहे, या मतचोरी विरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे. राज्य निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेऊन मतदार याद्या दुरूस्त करण्याची मागणी केली होती परंतु निवडणूक आयोग मात्र यावर कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही. लोकशाहीमध्ये निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पण निवडणूक आयोग कसलीच जबाबदारी घेत नसून ते जबाबदारीपासून पळ काढत आहे. आता जनताच धडा शिकवेल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने टूलच्या आधारे संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर दोन स्टारचे (**) चिन्ह लावले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याविषयी त्याच्याकडून अर्ज भरून घेतला जाईल.