“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:21 IST2025-11-21T19:21:36+5:302025-11-21T19:21:36+5:30
Congress Harshwardhan Sapkal: सरकारने आतातरी जागे व्हावे नाहीतर जनतेचा उद्रेक तुमच्या खुर्च्या उखडून टाकेल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal: मालेगावमध्ये तीन वर्षाच्या लहान मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना संतापजनक व अत्यंत गंभीर आहे. या घटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिला-मुलींची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच दिसते. राज्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. मालेगाव प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, आका, खोक्या यांचा नंगानाच सुरु आहे. मागील काही महिन्यातील घटना पाहता सरकारच्या आशिर्वादाने गुंडगिरी फोफावल्याचे दिसते. माफिया, गुंड, भ्रष्ट लोकांना सत्ताधारी पक्षात प्रवेश देऊन पवित्र करून घेतले जात आहे. सरकारच गुन्हेगारांना राजाश्रय देत असेल तर गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढणारच पण सरकारला त्याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही. पोलीस केवळ विरोधीपक्षांच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी, विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावण्यासाठी, विरोधकांचे फोन टॅप करण्यासाठी ठेवलेले आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली.
जनतेचा उद्रेक तुमच्या खुर्च्या उखडून टाकेल
फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडेला राजकीय व पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली या घटनेत सत्ताधारी भाजपाचा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव आहे पण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री कोणतीही चौकशी न करताच निंबाळकरांना क्लिन चिट देतात. आजही डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळालेला नाही आणि गुन्हेगार मात्र सरकारच्या आशिर्वादाने ताठ मानेने फिरत आहे. मालेगावच्या घटनेने जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. आरोपीला न्यायालयात आणले असता हा उद्रेक सर्वांनी पाहिला आहे. सरकारने आतातरी जागे व्हावे नाहीतर जनतेचा उद्रेक तुमच्या खुर्च्या उखडून टाकेल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री व पैठण येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीनिमित्त आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळावा घेतला तसेच भोकरदन येथे प्रचार सभेला संबोधित केले.