“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 08:40 IST2025-11-06T08:38:42+5:302025-11-06T08:40:09+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: आता त्याच सदोष मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरल्या जात आहेत, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजपा व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे पुरावे देऊन निवडणूक आयोगाला विवस्त्र केले पण निर्लज्जम सदा सुखी या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या कामात काहीच सुधारणा होत नाही. निवडणूक आयोग हा सरकारच्या हातातली कठपुतली बाहुली बनले आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राहुल गांधी यांनी देशासमोर पुराव्यासह ठेवल्यानंतरही निवडणूक आयोग जागा होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, झोपी गेलेल्याला जागे करणे सोपे आहे पण झोपेचे सोंग घेत असलेल्याला जागे करणे अवघड आहे. निवडणूक आयोग पुरावे मागत होते ते पुरावेही राहुल गांधी यांनी दिले. आम्ही त्यांना सांगतो की, सूर्य पूर्वेकडून उगतो, तर ते म्हणतात की, पश्चिम कडून का उगवत नाही याचे उत्तर द्या. निवडणूक आयोग हा सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, मतदार यादीमध्ये तांत्रिक घोटाळा मोठ्या प्रमाणात केला आहे. मतदार यादी नोंदण्याची आणि मतदार यादीमध्ये नाव इतरत्र वळविण्याच्या अनुषंगाने एकत्रित स्वरूपाची गुन्हेगारी सुरू असून निवडणूक आयोग मात्र हातावर हात देऊन बसला आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
महाराष्ट्रातही विधानसभेला तोच हरियाणा पॅटर्न
लोकशाहीमध्ये निवडणुका या निष्पक्ष व पारर्दशक पद्धतीने घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. पण आयोगच सरकारच्या ताटाखालचे मांजर बनून काम करत असेल तर ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे आणि तेच आज देशभरात होत आहे. हरियाणात २५ लाख मतांचा घोटाळा उघड झाला आहे. एकच व्यक्तीचे नाव विविध नावाने २२ वेळा मतदार यादीत असणे, एका ब्राझिलियन मॅाडेलचे नाव २२ वेळा मतदार यादीत असणे, अनेक वेगवेगळ्या बुथवर एकाच व्यक्तीचे नाव असणे अशा अनेक पद्धतीने मतदार याद्यांमध्ये गडबड करण्यात आली. महाराष्ट्रातही विधानसभेला तोच हरियाणा पॅटर्न वापरून भाजपाने चोरीचे सरकार बनवले. महाराष्ट्रात अवघ्या सहा महिन्यात ४७ लाख मतदार वाढले तर मतदानानंतर रात्रीच्या अंधारात जवळपास ८ टक्के मतदान वाढल्याचे दाखवले. आता त्याच सदोष मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरल्या जात आहेत. विरोधी पक्षांनी त्या याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली असता त्याकडे दुर्लक्ष करुन निवडणुका जाहीर केल्या हे सर्व भाजपाला अनुकुल आहे, असा दावा सपकाळ यांनी केला.
दरम्यान, मतदार यादीतील दुबार तिबार मतदाराच्या नावापुढे स्टार लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात घेतला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्याकडे दुबार, तिबार, दोनशेबार, पाचशे बार एका मतदाराचे नाव यादीत आहे, याचा स्पष्ट डेटा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाकडून अपेक्षा आहे की त्यांनी टू स्टार देऊन दोन नंबरी कारभार करू नये. निवडणूक आयोगाचा जो ४२० चा दस नंबरी कारभार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मतदार याद्यांतील घोळाबद्दल प्रश्नांच्या फैरी झाडल्या पण एकाही प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाला देता आले नाही. अशा भ्रष्ट मार्गाने निवडणुका होत असतील तर त्याचा काय उपयोग? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.