“नागपूरकरांनी शांतता राखावी, दगडफेक-जाळपोळ होणे गृहविभागाचे अपयश”: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:57 IST2025-03-18T09:56:43+5:302025-03-18T09:57:34+5:30

Congress Harshwardhan Sapkal News: नागपूरकरांनी शांतता राखावी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीका केली.

congress harshwardhan sapkal appeal that nagpur residents should maintain peace | “नागपूरकरांनी शांतता राखावी, दगडफेक-जाळपोळ होणे गृहविभागाचे अपयश”: हर्षवर्धन सपकाळ

“नागपूरकरांनी शांतता राखावी, दगडफेक-जाळपोळ होणे गृहविभागाचे अपयश”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी २० तरुणांना ताब्यात घेतले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, नागपूरकरांना शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही शांततेचे आवाहन करताना सरकारवर टीका केली. 

महालातील चिटणीस पार्क, तसेच गांधी गेट परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. काही तरुणांमध्ये वाद झाला आणि मग वेगवेगळ्या अफवा पसरत गेल्या. यामुळे मोठा जमाव परिसरात जमला. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली. पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली व धक्काबुक्की करण्यात आली. यात दोन पोलिसांचे कपडेदेखील फाटले. काही समाजकंटकांनी रस्त्यांवरील वाहनांना आग लावली. काही तरुण यावेळी जखमी झाले व त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परिस्थिती लक्षात घेता चिटणीस पार्कात अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले. 

दगडफेक-जाळपोळ होणे गृहविभागाचे अपयश

नागपूर शहरात आज रात्री घडलेला दगडफेकीची घटना अनावश्यक व अत्यंत दुर्देवी आहे. नागपूरकरांनी शांतता राखावी अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती मी सर्व नागपूरवासियांना करतो. नागपूर शहरात सर्व धर्मीय लोक अत्यंत गुण्यागोविंदाने व आनंदाने रहात आहेत. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर आहे या शहरात एवढ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो दगडफेक, जाळपोळ होते हे गृहविभागाचे अपयश आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

सत्ताधारी सातत्याने प्रक्षोभक वक्तव्ये करत होते त्याचा हा परिपाक आहे

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री जाणिवपूर्वक प्रप्रक्षोभक वक्तव्ये करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना नागपूरमध्ये यश आले आहे असे दिसते. राज्यासमोर अनेक ज्वलंत प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव नाही सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम मिळाली नाही, मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या सुरु आहेत. यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी सत्ताधारी सातत्याने प्रक्षोभक वक्तव्ये करत होते त्याचा हा परिपाक आहे, असा दावा सपकाळ यांनी केला. 

दरम्यान, नागपूर सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे. देशाच्या इतर भागात दंगली होत असताना नागपूरात कधीही दंगल झाली नव्हती रामनवमीला हिंदू मुस्लीम एकत्रीतपणे रथ ओढतात ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यात मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदू दर्शनाला जातात राजकीय फायद्यासाठी नागपूर पेटवण्याचा डाव आपण ओळखावा आणि शांतता राखावी असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.

 

Web Title: congress harshwardhan sapkal appeal that nagpur residents should maintain peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.