“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:51 IST2025-09-20T17:47:43+5:302025-09-20T17:51:19+5:30
Congress Harshvardhan Sapkal: सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यास पैसे नाहीत पण लाडक्या उद्योगपतीसाठी मात्र रेड कार्पेट अंथरले जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
Congress Harshvardhan Sapkal: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मतचोरीची एक एक प्रकरणे पुराव्यासह उघड करत आहेत, राहुल गांधी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहेत, पण उत्तरे मात्र भाजपाचे नेते देत आहेत. राहुल गांधींची पत्रकार परिषद होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला उत्तर देतात, राहुल गांधींचा लेख प्रकाशित होताच फडणवीस त्याला उत्तर देणारा लेख लिहतात, हे काय चालले आहे. फडणवीस निवडणूक आयोगाचे वकील आहेत, का दलाल? असा प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्रात राजुरा मतदार संघात मतचोरी झाली त्यावर अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे तरीही फडणवीस आयोगाच्या वतीने का बोलतात? रामराज्याची भाषा करता मग अग्निपरिक्षेला का घाबरता? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महिलांवरील अत्यचार वाढले आहेत. कोयता गँग, आका, खोक्या गँग, रेती गँगने धुमाकुळ घातला आहे. केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली जाते त्यावर कारवाई करावी यासाठी केंद्रीय मंत्र्याला पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या द्यावा लागतो एवढी गंभीर स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही, फडणवीस वेळ देऊ शकत नाहीत म्हणून पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना देण्यास पैसे नाहीत, पण लाडक्या उद्योगपतीसाठी मात्र रेड कार्पेट
भारताचे शेजारी देश श्रीलंका, बांगलादेश व नेपाळ मधील परिस्थिती विदारक असून स्थानिक जनतेचा उद्रेक झाला व अत्यंत वाईट पद्धतीने सत्ताधाऱ्यांना जीव मुठीत घेऊन पळावे लागले. भारतात गरिब व श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे. सरकार लाडक्या उद्योगपतीला एक रुपये एकर दराने जमीन दिली. मुंबईतील धारावी, गोरेगाव मधील जमीन कवडीमोल भावाने दिली. नवी मुंबई विमानतळही देऊन टाकला. तर गरज नसताना ८८ हजार कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग बनवला जात आहे. सरकारकडे पगार करण्यास पैसे नाहीत, लाडक्या बहिणी साठी पैसे नाहीत, शेतकऱ्यांना देण्यास पैसे नाहीत पण लाडक्या उद्योगपतीसाठी मात्र रेड कार्पेट अंथरले जात आहे, असेही सपकाळ म्हणाले.
दरम्यान, यापुढे नथुराम चालणार नाही तर संविधानच चालेल असे संकेत नियतीनेच दिले आहेत. सर्वांनाबरोबर घेऊन जाणारा संविधानाचा विचारच चालणार आहे, त्यामुळे संघाने नागपूरच्या रेशीम बाग कार्यालयात संविधान ठेवावे. २८ तारखेपासून संविधान सत्याग्रह यात्रा आयोजित केली असून यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी रेशीम बागेत जाऊन संघाला संविधान भेट देणार आहेत.