‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:39 IST2025-09-19T11:38:12+5:302025-09-19T11:39:29+5:30
Vijay Wadettiwar News: राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून २०१४ पासून तालुका पातळीवर, वर्ष निहाय मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी
मुंबई - राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ओबीसी उपसमितीच्या सदस्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत आतापर्यंत मराठा समाजाला जे कुणबी, मराठा कुणबी,कुणबी मराठा दाखले दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याबाबत समितीचे एकमत झाल्याची भूमिका मांडली आहे. याबाबत सरकारने काय कारवाई केली, अशी विचारणा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे.
राज्याचे इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सरकारची श्वेतपत्रिकाबाबत काय भूमिका आहे हा प्रश्न उपस्थित केला आहे. उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असून ज्येष्ठ मंत्री भुजबळ देखील या समितीत आहे. समितीमध्ये श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीबाबत एकमत झाले असेल तर याबाबत सरकारने कारवाई केली का? केली तर काय कारवाई केली अशी विचारणा वडेट्टीवर यांनी पत्रातून केली आहे.
तसेच विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून २०१४ पासून तालुका पातळीवर, वर्ष निहाय मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
राज्यात आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली जात प्रमाणपत्रे यांची माहिती डिजिटल स्वरूपात देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी पत्रात केली आहे. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येणार आहे अस असताना आतापर्यंत किती प्रमाणपत्रांचे वाटप झाले याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी पत्र लिहून मागितली आहे.