विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 09:46 IST2025-07-24T09:45:49+5:302025-07-24T09:46:17+5:30
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात संपणार असल्याने काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
दीपक भातुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात संपणार असल्याने काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत २९ ऑगस्ट रोजी संपत असल्याने नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांना निरोप देण्यात आला. औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या दानवे यांच्या निवृत्तीने उद्धवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी होत आहे. त्यामुळे काँग्रेसने जास्त संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचे ठरवले आहे.
विधानपरिषदेत काँग्रेसचे आठ, उद्धवसेनेचे सध्या सात सदस्य आहेत. दानवे निवृत्त झाल्यानंतर उद्धवसेनेचे संख्याबळ सहा होईल. काँग्रेसला शरद पवार गट आणि काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. याआधारे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या या पदासाठी काँग्रेसकडून सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. सध्या सतेज पाटील हे विधानपरिषदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नावाला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्याचेही समजते.
उद्धवसेनेचा पाठिंबा मिळेल?
विरोधी पक्षाचे एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के उमेदवार निवडून आलेले नाहीत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित ठेवला. उद्धवसेनेने विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नियुक्तीचे पत्र नार्वेकर यांना दिले आहे. भास्कर जाधव यांच्या नावाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा पाठिंबा मिळेल, असा काँग्रेसला विश्वास आहे.