राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसची उद्धवसेनेला गळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 06:24 IST2026-03-04T06:24:11+5:302026-03-04T06:24:29+5:30
शरद पवार यांच्यासाठी ही जागा सोडावी, अशी मागणी शरद पवार गटातर्फे केली जात आहे. मात्र काँग्रेसकडून या जागेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसची उद्धवसेनेला गळ
- दीपक भातुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एक जागा निवडून येऊ शकते. मात्र या एका जागेवरून महाविकास आघाडीत अद्याप निर्णय झालेला नाही. ५ मार्च रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीत राज्यसभेची ही एक जागा कोण लढवणार याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
शरद पवार यांच्यासाठी ही जागा सोडावी, अशी मागणी शरद पवार गटातर्फे केली जात आहे. मात्र काँग्रेसकडून या जागेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दिल्लीतील एका बड्या काँग्रेस नेत्याने उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा करून ही जागा काँग्रेसला सोडण्याची गळ घातल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडावी आणि पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या विधानपरिषदेची जागा उद्धवसेनेने घ्यावी, असा प्रस्ताव काँग्रेसने ठाकरे यांच्यासमोर ठेवल्याचे समजते. दुसरीकडे उद्धवसेनेनेही या जागेवर दावा सांगितला आहे. तर उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यातही नुकतीच या जागेबाबत चर्चा झाली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सध्या राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहेत. हे पद टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसला दोन जागा निवडून आणाव्या लागतील. तेलंगणातून एक जागा निश्चित असली तरी महाराष्ट्रातील दुसरी जागा मिळवणे काँग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे.
महाविकास आघाडी हा तीन तिघाडा आहे, पण काम बिघाडा नाही. एक जागा आहे आणि त्यासाठी तीनही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. शेवटच्या मिनिटांपर्यंत ती सुरू राहू शकते. लवकरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल.
- संजय राऊत, नेते, उद्धवसेना